पुढील तीन दिवस राज्यात यलो अलर्ट : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 02:39 PM2024-05-12T14:39:11+5:302024-05-12T14:39:26+5:30
राज्यात एका बाजूने उष्णतेचा पारा ३४.५ अंश पर्यंत जात आहे तर दुसऱ्या बाजूने आता पाऊसही येत आहे. शनिवारी संपूर्ण गाेव्यात गडगडाटसह मुसळधार पाऊस पडल्याने शनिवारी रात्री गारवा तसेच थंडी पडली होती.
नारायण गवस
पणजी: राज्यात शनिवारी अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला हवामान खात्याने आज १२ ते १५ मे पर्यंत पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला असून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे.
राज्यात एका बाजूने उष्णतेचा पारा ३४.५ अंश पर्यंत जात आहे तर दुसऱ्या बाजूने आता पाऊसही येत आहे. शनिवारी संपूर्ण गाेव्यात गडगडाटसह मुसळधार पाऊस पडल्याने शनिवारी रात्री गारवा तसेच थंडी पडली होती. गेले महिनाभर लाेक या उष्णतेने हैराण झाले होते. त्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळाला आहे. आता पुढील तीन दिवस यलो अलर्ट असल्याने जाेरदार पावसाची शक्यता आहे.
फोंड्यात सर्वाधिक जास्त पाऊस
राज्यात गेल्या २४ तासात फोंडा, वाळपई आणि जुने गाेव्यात १.५ इंच पावसाची नाेंद झाली आहे. मार्च १ ते आतापर्यंत फोंड्यात सर्वाधिक जास्त ४.१२ इंच पावसाची नाेंद झाली आहे. तर पणजीत आतापर्यंत ३.५ इंच पावसाची नाेंद झाली आहे. तर काणकोणात सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ०.१४ इंच एवढी नोंद झाली आहे.
तापमान पोहचले ३४.६ अंशावर
राजधानी पणजीत कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस नाेंद करण्यात आले आहे तर किमान तापमान २५.६ अंश नोंद करण्यात आले आहे. तसेच मुरगावात ३३.८ अंश तर किमान २५.७ अंश एवढे तापमान रविवारी नोंद करण्यात आले आहे. मागिल आठवडेपक्षा राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती उष्णता तसेच मधोमध पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे.