होय, गोवा हादरलाच; संपूर्ण देशात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 08:08 AM2024-01-11T08:08:01+5:302024-01-11T08:09:18+5:30

देशात पुन्हा एकदा गोव्याची चर्चा सुरू आहे.

yes goa in shock suchana seth crime and its impact | होय, गोवा हादरलाच; संपूर्ण देशात चर्चा

होय, गोवा हादरलाच; संपूर्ण देशात चर्चा

टिक टॉक स्टार सोनाली फोगाट गोव्याची नव्हती. ती हरयाणाची. मात्र, गोव्यात सुटीवर येऊन राहिली. क्लबमध्ये गेली. ड्रग्जचे अतिसेवन केले आणि गोव्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना गेल्यावर्षीची. त्यावेळी पूर्ण देशात गोव्याची चर्चा झाली. ड्रग्जमुळे गोव्याची नाचक्कीही झाली. 

सूचना सेठ हिचाही गोव्याशी काही संबंध नव्हता. तिने आपल्या चार वर्षाच्या बाळाला मारण्याचा कट केला, त्यासाठी ती गोव्यात आली. बार्देशातील हॉटेलमध्ये राहिली. खून केला व गेली. ती पश्चिम बंगालची, केरळच्या माणसाशी लग्न केले आणि कर्नाटकात स्थायिक झाली. लग्नानंतर नऊ वर्षांनी तिला मुलगा झाला होता. पतीशी बिनसले, विषय घटस्फोटापर्यंत गेला. तिने अत्यंत निर्दयी पद्धतीने मुलाचा जीव घेतला, असे प्राथमिकदृष्ट्या पोलिस तपासातून कळून येते. 

देशात पुन्हा एकदा गोव्याची चर्चा सुरू आहे. आत्महत्या किंवा खून करण्यासाठी किंवा ड्रग्जचे अतिसेवन करण्यासाठी अनेक जण गोव्याचीच निवड करतात, असा एक चुकीचा संदेशही देशभर गेला. काही गुन्हेगार, गँगस्टरदेखील गोव्यात येऊन राहतात. त्यातील काही जण कसिनोमध्ये जाऊन पैसा उधळतात. सूचना सेठच्या कृत्याने मात्र गोवा हादरलाच. गोमंतकीयांच्या काळजाला वेदना झाल्या. गेल्या ४८ तासांपैकी जास्त काळ गोव्यात त्या बाळाच्या खुनाचीच चर्चा आहे. घरोघर महिला हळहळल्या आणि पुरुषांचेही मन द्रवले. एक उच्चशिक्षित महिला अशी कशी वागू शकते, या प्रश्नाचे उत्तर लोकांना सापडले नाही. चार वर्षे मुलाला अंगाखांद्यावर खेळवले. त्याच मुलाचा गळा दाबून किंवा उशीचा वगैरे वापर करून गुदमरून मारून टाकणारी आई जगात कुठेच जन्माला येऊ नये, अशीच प्रार्थना प्रत्येक संवेदनशील माणूस करील.

बाळाचा जीव घेतल्यानंतर त्याचे प्रेत बॅगेत घालून गोव्याहून कर्नाटकात नेण्याएवढे बळ आणि निर्दावलेपणा एका महिलेच्या अंगी कुठून येतो, हा प्रश्नही पडतोच, कथित न्यायालयीन आदेशानुसार आपल्या मुलाचा संबंध पुन्हा पुन्हा त्याच्या वडिलांशी येईल किंवा कधी तरी आपला नवरा मुलाला ताब्यात घेईल, या भीतीपोटी किंवा द्वेषापोटी बाळालाच जगातून संपविणारे हात किती क्रूर असतील, याची कल्पना करता येते. ज्या देशात मदर तेरेसा, साने गुरुजी यांच्या मातृहृदयी कार्याचे कौतुक होते, त्याच समाजात आपल्या गाँडस बाळाला कुरवाळत मारणारी प्रवृत्तीही जन्म घेते, हे धक्कादायकच मुले म्हणजे देवाघरची फुले, यापैकी एका फुलाने हे जग नीट पाहण्यापूर्वीच त्या मुलाच्या आईने फूल नष्ट करून टाकले. हे ऐकूनच अंगावर काटा आला, खुनी प्रवृत्तीच्या या महिलेविषयी वाचकांच्या डोक्यात संतापाची तिडीकही येऊन जाईल.

सूचना सेठ हिचे वागणे व कृती ही मानसोपचारतज्ज्ञांसमोरही आव्हान आहे. आपल्याच मुलाला मातेने जिवंत मारणे यास इंग्रजीत 'फिलिसाइडल मदर' असा शब्द आहे. 'मॅटरनल फिलिसाइड' असेही म्हटले जाते, सूचना सेठ ही 'फिलिसाइडल मदर' ठरली आहे. तिच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची कोणतीही भावना नाही, असे पोलिस सांगतात. पोलिस तिची मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी करून घेतीलच. तिच्या मनाची स्थिती हा सर्वच महिला व पुरुषांनाही पडलेला प्रश्न आहे. मुलाचा जीव घेण्याच्या इराद्यानेच ती गोव्यात आली, हॉटेलमध्ये थांबली, हे आता स्पष्टपणे कळून येते. तिने अजून आपला गुन्हा कबूल केलेला नाही, हे आणखी धक्कादायक आहे. 

निदान पश्चात्ताप झाल्यानंतर तरी आई किंवा वडील, अशा प्रकारचा गुन्हा कबूल करतात. तिने घेतलेल्या उच्च शिक्षणाचाही तिने आपल्या वर्तनातून पराभव केला आहे. मुलाचे प्रेत बॅगेतून घेऊन जाणे व पोलिसांनी फोनवर विचारणा केल्यानंतर आपले मूल दुसरीकडे मित्र-मैत्रिणीकडे ठेवून आले आहे, असे सांगणे, हा सारा प्रकार उलट्या काळजाचा माणूसच करू शकतो. मांजर, कुत्रे किंवा अन्य जनावरेदेखील आपल्या पिलांना अतिशय काळजीपूर्वक जपतात. दुसऱ्यापासून त्रास होऊ नये म्हणून काही प्राणी वारंवार आपल्या पिलांची जागा बदलत असतात. सूचना सेठ हिच्या बाळाला जगण्याचा पूर्ण अधिकार होता, जगात आपले भविष्य घडवून पुढे कर्तृत्व दाखविण्याचा त्याचा हक्क विकृत प्रवृत्तीने संपविला.
 

Web Title: yes goa in shock suchana seth crime and its impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा