होय, आता देश सर्वांनाच आपला वाटतोय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 10:29 AM2024-03-15T10:29:32+5:302024-03-15T10:30:20+5:30
फोंडा येथील व्यावसायिक, विक्रेत्यांच्या विविध समस्या घेतल्या जाणून
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आम्ही फक्त मतदानादिवशी लोकांची मते घेत नाही, तर लोकांना कसा देश हवा या संदर्भातले मत सुद्धा विचारात घेतो. लोकांचे विचार मागवूनच भाजप आपला जाहीरनामा ठरवतो. म्हणूनच हा देश सर्वांचा बनत चालला आहे इथल्या प्रत्येकाला हा देश आपला वाटू लागला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले
फोंडा येथील व्यावसायिक व विक्रेते यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी मंत्री रवी नाईक, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मनोहर आडपाईकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवून उद्योग-व्यवसायाच्या वाढीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सामान्यातला सामान्य माणूस उद्योग व्यवसायात प्रवेश करेल, अशी यंत्रणा निर्माण केली आहे. आज देशात उद्योग- व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून इथल्या नागरिकांनी त्याचा फायदा करून घ्यावा व उद्योग-व्यवसायात स्वतःची मुहूर्तमेढ रोवावी, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, लोकांना जे आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता करण्याची गॅरंटी घेणारे सरकार मागच्या दहा वर्षात भारतात आहे. काँग्रेसच्या काळात मतदारांना मान नव्हता, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान नव्हता भाजपमध्ये सामान्य कार्यकत्यांचा गौरव होतो, हे लक्षात आल्यानेच आज देशातील काँग्रेसचे सर्व मोठे नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. गरिबीवर बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही. गरिबी हटावच्या घोषणा देत त्यांनी नेहमी सत्ता मिळवली. मात्र, देशातील गरिबी त्यांना हटविता आली नाही. याबाबत त्यांनी आत्मचिंतन करायला हवे. गरिबांना मदतीचा हात देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.
व्यावसायिक व विक्रेते यांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती मिळते. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी सामान्य लोकांनी उद्योग-व्यवसायात प्रवेश करावा. म्हणून मुद्रासारख्या योजना राबविल्या आहेत. उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी पोषक वातावरण आज देशात निर्माण झाले आहे. गोव्यातही लोकांनी उद्योग-व्यवसायात उतरावे म्हणून गोवा सरकारने केंद्र सरकारच्या सहायाने अनेक कार्यक्रम राबविले आहेत.
महिला उद्योग-व्यवसायात यावेत म्हणून ईडीसीच्या माध्यमातून सुलभ कर्ज पुरवठा योजना सुरू केली आहे. जिथे तीस टक्के अनुदानाची सुद्धा सोय करण्यात आली आहे. परराज्यातील दळणवळण सोयीचे व्हावे म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्टार्ट अपसारखी महत्त्वाकांक्षी योजना राबविणारा भारत हा पहिला देश असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, कृषी क्षेत्रातील लोकांना पूर्वी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून कर्ज काढावे लागायचे. आज ती परिस्थिती राहिली नाही. भाजप सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत आहे. म्हणून सगळ्या योजना लोकांना मिळत आहेत. पूर्वी पैसा काँग्रेसच्या घशात जायचा.
आज सामान्य लोकांचा पैसा थेट बँकेत जात आहे, निवडणुकीवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्यावेळी मते मागायला येतील, त्यावेळी त्यांना गोमंतकीय जनतेने या संदर्भात सवाल केला पाहिजे. आज केंद्र सरकारकडून गोव्याला एवढा निधी मिळत आहे, मग काँग्रेसच्या कार्यकाळात तो निधी का मिळत नव्हता. याचे उत्तर काँग्रेसने द्यायला हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.