‘कालचा गोंधळ बरा नव्हता’
By admin | Published: September 14, 2015 02:01 AM2015-09-14T02:01:25+5:302015-09-14T02:01:36+5:30
दोन आठवड्यांपूर्वी अगदीच अनिर्बंध असलेली पणजी शहरातील वाहतूक काही नियमांची वळणे घालून ‘वन वे’ करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घे
दोन आठवड्यांपूर्वी अगदीच अनिर्बंध असलेली पणजी शहरातील वाहतूक काही नियमांची वळणे घालून ‘वन वे’ करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आणि अंमलबजावणीही केली. पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून वळणे रोखली किंवा सक्तीची वळणे घेण्यास भाग पाडले तेव्हा सुरुवातीला अनेकांनी नाके मुरडली; परंतु दोन आठवड्यांनंतरचा अनुभव मात्र नवीन व्यवस्था ही योग्य आणि सुखकर असल्याचा निष्कर्ष काढत आहे. कालपर्यंत चाललेला गोंधळ हा योग्य नव्हता, हेच आता स्पष्ट होत आहे.
पणजीत नेहमीच होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाने काही बारीकसारीक बदल करण्याचे प्रयोग करून पाहिले होते; परंतु मोठा बदल करण्याचे धाडस दाखविले नव्हते. पहिल्यांदाच मोठा निर्णय घेताना शहरातील ९० टक्के रस्ते हे एकेरी (वन वे) करण्याचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. अगदीच किरकोळ रहदारीचे आणि रुंदी अधिक असलेल्या एक-दोन रस्त्यांवरून दोन्ही बाजूने वाहतूक चालू ठेवण्यात आली.
१ सप्टेंबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली. सुरुवातीला गोंधळ झाला. शॉर्टकट्स रोखल्यामुळे काही प्रमाणात पोलिसांबरोबर अरेरावीची भाषाही झाली; पण एक-दोन दिवसांनंतर नवीन रचना सोयीची वाटू लागली. विविध क्षेत्रांतील पणजीतील लोकांशी संवाद साधला असता सकारात्मक प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर व एसएमएसद्वारे मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत सकारात्मक होता, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिली.
याविषयी प्रतिक्रिया देताना व्यवसायाने वैद्यकीय प्रतिनिधी असलेले देवदत्त पागी यांनी सांगितले की, नवीन रचना जरा अडखळल्यासारखी वाटली. शॉर्टकट्स रोखल्यामुळे हिरमोडही झाला; परंतु आता नवीन व्यवस्थेशी ताळमेळ जुळू लागला आहे. वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार फारच कमी होऊन वाहतूक सुरळीत झाली आहे. एक महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर नवीन रचना जरी असली तरी ती कायम ठेवावी, असे ते म्हणाले. अशाच प्रतिक्रिया आणखी चार जणांनी दिल्या.