हरिद्वारच्या प्रशिक्षकांकडून गोव्यातील शिक्षकांना योगाचे टाॅनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 10:37 AM2017-10-17T10:37:03+5:302017-10-17T10:37:10+5:30
हरिद्वारमधील पतंजली विद्यापीठाकडून गोव्याच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आधारे गोव्यातील विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे.
पणजी : हरिद्वारमधील पतंजली विद्यापीठाकडून गोव्याच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आधारे गोव्यातील विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मूल्य शिक्षण देणे विद्यालयांमध्ये येत्या महिन्यात सुरू होत आहे.
गोव्यातील 151 विद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यापुढे लवकरच गोव्यातील उर्वरित सर्व सरकारी प्राथमिक विद्यालयांमधून योग शिक्षण सुरू केले जाईल, असे गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष कांता पाटणेकर यांनी येथे लोकमतला सांगितले. यासाठी उर्वरित शिक्षकांना हरिद्वारमधील विद्यापीठाच्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल, असे पाटणेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना प्राणायाम व आसने शिकविली जातील. शिवाय योग हा विषय अभ्यासक्रमातून लागू केला जाईल, असे पाटणेकर यानी सांगितले. गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये विविध समस्या आढळून येतात. काहीजणांचे अभ्यासाकडे लक्ष लागत नाही तर काहीजण व्यसनांच्या आहारी जातात. काहीजण भावनिकदृष्ट्या अडचणीत असतात तर काहीजण आत्महत्या करण्याचा विचार करतात. या सर्व प्रश्नांवर योगाद्वारे भविष्यात उपाय निघेल असा विश्वास पाटणेकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान येत्या नोव्हेंबरपासून प्रथमच राज्यातील विद्यालयांमध्ये मूल्य शिक्षण सुरू केले जाईल. त्यासाठीची पाठ्यपुस्तके शिक्षण खात्याकडे उपलब्ध झाली आहेत. मुत्ता फाऊंडेशन त्यासाठी गोव्याला मदत करत आहे.