गोव्यात गव्याने घेतला तरुणीचा बळी, ग्रामस्थ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:38 PM2018-07-09T16:38:00+5:302018-07-09T16:38:11+5:30

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या सत्तरी तालुक्यातील शेळमेळावली या गावात गव्यारेड्यांनी उच्छाद मांडला आहे.

young girl was killed in Goa | गोव्यात गव्याने घेतला तरुणीचा बळी, ग्रामस्थ संतप्त

गोव्यात गव्याने घेतला तरुणीचा बळी, ग्रामस्थ संतप्त

Next

पणजी : गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या सत्तरी तालुक्यातील शेळमेळावली या गावात गव्यारेड्यांनी उच्छाद मांडला आहे. गवे लोकवस्तीत पोहोचले असून, सोमवारी सकाळी एका 23 वर्षीय तरुणीचा गव्यारेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ संतापले आहेत. वन खाते काहीच उपाययोजना करत नसल्याने सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे.

गेल्या महिन्यातही गव्यारेड्यांच्या हल्ल्यात सत्तरी तालुक्यातील शिंगण या गावात ज्योती गावकर या महिलेचा बळी गेला होता. ती महिला काजू बागायतीत गेली असता तिच्यावर गव्याने हल्ला केला होता. त्यामुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वन खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांची चर्चा करून गव्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती. गव्यांचा कळपच गावात येतो व यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. मात्र आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतरही वन खात्याच्या यंत्रणेने काहीच उपाययोजना केली नाही.

पूजन मेळेकर ही 23 वर्षीय तरुणी एकाच्या स्कूटरवर बसून कामाला जात होती. ती उसगावमधील खासगी उद्योगात काम करते. सकाळी साडेसातच्या सुमारास गव्याने स्कुटरवर हल्ला केला. या हल्ल्यात ही मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. नंतर इस्पितळात तिचे निधन झाले. दुसरा इसम जखमी झाला. मुलीचे निधन झाल्यामुळे गावात शोककळा पसरली. दुपारी काही ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. अगोदर उपवनपालांना बोलवा, आम्हाला गव्यांच्या समस्येवर तोडगा हवा आहे, असे संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक वनअधिका-याला सांगितले. मंत्री विश्वजित राणे यांनी पणजीहून सत्तरीत धाव घेतली. त्यांनी शेळमेळावली गावाला भेट दिली. मंत्री राणे हेही उपवनपालांशी बोलले. ग्रामस्थांनी नंतर मृतदेह स्वीकारले पण वन खात्याच्या अनास्थेबाबतचा लोकांमधील संताप कमी झालेला नाही.

वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी असंवेदनशील बनले आहेत. आपण गेल्या महिन्यात लिहिलेल्या पत्रानंतर उपाययोजना झाली असती तर दुसरा बळी गेला नसता, असे मंत्री राणे म्हणाले. गोवा सरकारने कर्नाटक किंवा महाराष्ट्र सरकारशी बोलावे व तेथून पथक आणून गव्यांविरुद्ध उपाययोजना करावी, या गव्यांना पुन्हा अभयारण्यात नेऊन सोडावे, अशी मागणी राणे यांनी केली आहे. दरम्यान, सत्तरी तालुक्यातील शेतक-यांची पिके रानडुक्कर, माकड, खेती, गवे वगैरे नष्ट करत असल्याने शेतकरीही नाराज आहेत.

Web Title: young girl was killed in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा