पोलिसांकडून चामड्याच्या पट्ट्यानं बेदम मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 07:12 PM2018-11-26T19:12:28+5:302018-11-26T19:16:35+5:30
पाच पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप
मडगाव: पोलिसांनी चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला आहे. रविवारी कुंकळ्ळी पोलिसांनी पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप 32 वर्षांच्या क्लीन्ट रिबेलोने केला आहे. या मारहाणीत सामील असलेल्या पाच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मैदान सोडत नसल्याच्या कारणावरुन एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर डिसुझा या 20 वर्षीय तरुणाला आयआरबी पोलिसांकडून बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता हा दुसरा प्रकार घडला आहे.
सोमवारी रिबेलो यांनी आपल्या पाठीवर उमटलेले पट्ट्याच्या मारहाणीचे वळ दाखवताना पोलिसांनी आपल्याला प्रथम घटनास्थळावर व नंतर पोलीस स्थानकात नेऊन मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणात वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनीही लक्ष घातले असून या संबंधी लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल असे त्यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या कक्षेत येणाऱ्या एका ठिकाणी अपघात झाल्यामुळे पोलिसांनी वाहने अडवून ठेवली होती. त्यात क्लीन्ट याच्याही वाहनाचा समावेश होता. ही वाहने का अडवण्यात आली आहेत, असे पोलिसांना विचारल्यावर अपघात झाल्यामुळे असे उत्तर पोलिसांकडून त्याला मिळाले. त्यावर पोलिसांना वेड लागले आहे का, असे उद्गार क्लीन्ट याच्या तोंडातून आल्याने संतापलेल्या पोलिसांनी त्याला घटनास्थळावरच मारहाण केली, असा आरोप त्याने केला. नंतर आपल्याला पोलीस स्थानकात नेऊन चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली असेही त्याने सांगितले.
सदर घटनेनंतर त्याला बाळ्ळीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे त्याला फारसे काही लागले नसल्याचे सांगून घरी पाठवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तोर्पयत ही बातमी सगळीकडे पसरल्याने सरपंच डिसिल्वा त्याच्या मदतीला धावून आले. रात्री 12 वाजता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोमवारीही त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.