गोव्याची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक: आमदार राजेश फळदेसाई
By समीर नाईक | Published: March 18, 2024 02:55 PM2024-03-18T14:55:58+5:302024-03-18T14:56:12+5:30
आपण आपली परंपरा जपली पाहिजे.
समीर नाईक, पणजी: राज्याला समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्यात विविध संस्कृती पाहायला मिळते, ही परंपरा, संस्कृती जपणे हे आजच्या पीढीसाठी मोठी जबाबदारी असणार आहे. आमची परंपरा पुढे नेण्यासाठी युवक महत्वाची निभावू शकतात, पण यासाठी युवकांना सर्वोपरी मदत, प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष तथा कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केले.
शांतादुर्गा सांस्कृतिक संघटना, कुंभारजुवा आणि कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने कुंभारजुवा येथे आयोजित परंपरा महोत्सवात प्रमुख पाहुणे या नात्याने आमदार राजेश फळदेसाई बोलत होते. यावेळी त्यांच्यासाेबत कुंभारजुवाचे सरपंच नंदकुमार शेट, प्रशांत भंडारी व इतर मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य महेंद्र गावकर यांनी गेल्या ५० वर्षांपासून संस्था चालविण्याच्या प्रयत्नांची नोंद घेत आमदारांनी त्यांचे कौतुक केले.
शांतादुर्गा सांस्कृतिक संघटना, कुंभारजुवे सुमारे ५० वर्षांपासून सुरू आहे, ही स्वतःच एक मोठी उपलब्धी आहे. त्यांनी राज्यातील सांस्कृतिक परंपरा कायम ठेवली, तसेच त्यांच्या उपक्रमांद्वारे कुंभारजुवेतील तरुणांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. महेंद्र गावकर परिश्रम घेत त्यांनी संघटनेला मोठ्या उंचीवर नेले आहे. मी नेहमीच तरुणांना पुढे जाऊन आपली प्रतिभा दाखवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. सार्वजनिक गणेशोत्सव, सांगोडोत्सव, यांच्यामुळे कुंभारजुवे आपल्या समृद्ध कलात्मक प्रतिभेसाठी ओळखला जातो. गेल्या ३० वर्षांपासून याचे सातत्य युवकांनी ठेवले आहे, असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.
आपण आपली परंपरा जपली पाहिजे. तब्बल ५० वर्षे अशी संस्था चालवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि गेली अनेक वर्षे ही संस्था अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आली आहे. अशा कार्यक्रमांना पाठिंबा देणाऱ्या आणि कुंभारजुवेमधील प्रलंबित रस्त्यांच्या कामासारख्या अनेक आश्वासनांची पूर्तता करणाऱ्या आमच्या आमदारांचेही मी आभार मानतो. त्यांची सक्रियता वाखाणण्याजोगी आहे. गावाच्या विकासासाठी काही सूचना असतील तर त्या पंचायत किंवा आमदाराकडे पाठवा, आम्ही लोकांच्या सेवेसाठी नेहमीच उपलब्ध असणार, असे सरपंच नंदकुमार शेट यांनी सांगितले.