युवकांनी कृषी क्षेत्रात पुढे येऊन देशाचा विकास घडवावा; आमदार राजेश फळदेसाई यांचे युवकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 03:47 PM2024-01-17T15:47:46+5:302024-01-17T15:49:07+5:30
महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कुंकळ्ळीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
नारायण गावस, पणजी : कृषी हा आमच्या देशाचा कणा असून युवकांनी शेतीची कामे करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष तथा कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केले. देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या युवकांचे ही त्यांनी कौतुक केले. जुने गोवे येथील गोवा कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताह सोहळ्यात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कुंकळ्ळीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
जुने गोव्यातील नवीन महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांचे कौतुक करून आमदार फळदेसाई यांनी विद्यार्थ्यांना शेतीकरण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी चुकीच्या कामात अडकू नये, असे आवाहन ही आमदारांनी केले असून, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्येसाठी मदत करण्याचे आश्वासन आमदार राजेश फळदेसाई यांनी दिले. देशाच्या विकासाला जोमाने आणि आत्मविश्वासाने चालना देण्यासाठी तरुणांना प्रेरणा देऊन त्यांचे सक्षमीकरण करूया. नावीन्यपूर्णता, सर्वसमावेशकता आणि सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणारा समाज घडवूया, असे ते म्हणाले.
देशभरातील तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध होत असून, त्यासाठी सरकार अधिक वेळ काम करत आहे. ‘विकसित भारत’ अर्थात भारताचा हा अमृत काल येण्यासाठी युवकांनी देखील मोठे योगदान दिले पाहिजे, असे आमदार राजेश फळदेसाई म्हणाले.