गोव्यात नरकासुर प्रतिमा तयार करण्यात युवकांचे कौशल्य पणाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:43 AM2019-10-15T11:43:27+5:302019-10-15T11:43:55+5:30
नरकासुर प्रतिमा तयार करणे व त्या जाळून प्रकाशाने अंधारावर मात केली असे जाहीर करण्याची परंपरा गोव्यात आहे.
पणजी : दिवाळीचा सण आल्यामुळे गोव्यातील हजारो युवक सध्या भव्य नरकासुर प्रतिमा तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक वाड्यावर नरकासुर प्रतिमा तयार केली जात आहे. दिवाळीच्या आदल्या रात्री नरकासुराचे दहन करून मगच गोव्यात दिपोत्सव साजरा केला जातो.
नरकासुर प्रतिमा तयार करणे व त्या जाळून प्रकाशाने अंधारावर मात केली असे जाहीर करण्याची परंपरा गोव्यात आहे. उर्वरित भारताप्रमाणेच गोव्यालाही सध्या दिपोत्सवाचे वेध लागले आहेत. नरकासुराची प्रतिमा तयार करून दिवाळीच्या आदल्या रात्री तिची शहरात आणि गावाच्या सीमेपर्यंत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर तरुणांकडून ती प्रतिमा रस्त्यावरच जाळली जाते.
नरकासुर म्हणजे वाईट प्रवृत्तींचे प्रतिक. त्याचा विनाश करणे म्हणजे वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविणे असा अर्थ होतो. नरकासुर प्रतिमा तयार करताना त्या प्रतिमेच्या पोटात दारुगोळा भरलेला असतो. फटाक्यांसह अन्य सर्व दारूगोळा नरकासुराच्या दहनावेळी फुटतो. त्यावेळी उपस्थित युवकांकडून मोठा जल्लोष केला जातो. काही ठिकाणी नरकासुर प्रतिमा मध्यरात्र उलटून गेल्यानंतर लगच जाळतात तर काही ठिकाणी पहाटे चार वाजता प्रतिमा जाळली जाते.
गोव्यात पणजी, मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा, साखळी, डिचोली, कुडचडे, केपे, काणकोण, पेडणे, वाळपई आदी सर्व शहरांमध्ये मिळून शेकडो नरकासुर प्रतिमा तयार करण्याच्या कामात सध्या युवकांचे हात गुंतलेले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व 191 ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये मिळून काही हजार नरकासुर प्रतिमा तयार केल्या जात आहेत. या प्रतिमांना लावण्यासाठी अनेक मोठमोठे मुखवटे बाजारात उपलब्ध झाले आहेत. एकदा नरकासुर प्रतिमेचे दहन केले की, मग घरोघर दिप पेटविले जातात. आकाश दिवे लावले जातात व पणत्या पेटवून दिपोत्सवाचे स्वागत केले जाते. नरकासुर प्रतिमा तयार करताना पाऊस आल्याने कामात थोडा व्यत्यय येतो पण युवकांचा उत्साह कमी होत नाही.