गोव्यात राष्ट्रवादीशी युतीस काँग्रेसचा नकार
By admin | Published: January 16, 2017 05:42 AM2017-01-16T05:42:09+5:302017-01-16T05:42:09+5:30
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त नेते चर्चिल आलेमाव यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला
पणजी : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त नेते चर्चिल आलेमाव यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसचा कोणताही संबंध राहणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
या निर्णयामुळे आलेमाव व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. गोवा फॉरवर्डचे प्रणेते आमदार विजय सरदेसाई यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष निवडणुकीत कोणाबरोबरही युती करणार नाही. मात्र, गोवा फॉरवर्डबरोबर जागा वाटप करील. काँग्रेसला राष्ट्रवादीबरोबर युती करण्याची मुळीच इच्छा नाही. गोवा फॉरवर्डबरोबर युती केली असती तर राष्ट्रवादीबरोबरही करावी लागली असती. आलेमाव यांच्यासोबत काँग्रेसचे कोणतेही संबंध नको, अशी भूमिका श्रेष्ठींनी घेतली आहे. . (विशेष प्रतिनिधी)
राहुल गांधींचा नकार : काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होणार होती; पण चर्चिल आलेमाव यांच्याशी काहीच संबंध नको, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली होती. त्यानंतर निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीसोबत २०१२ मध्ये काँग्रेसची युती होती.