स्मृतिभृंशाने त्रस्त वृद्धांसाठी निवारा केंद्रे उभारण्याच्या योजनेला गोव्यात शून्य प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 08:27 PM2017-11-13T20:27:37+5:302017-11-13T20:27:52+5:30
स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्या वृद्धांसाठी निवारा केंद्रे उभारण्याच्या सरकारच्या योजनेला गोव्यात बिगर शासकीय संघटनांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात स्मृतिभृंशाने त्रस्त असंख्य वृद्ध असूनही याबाबतीत कुठलीही संघटना पुढे आलेली नाही.
पणजी : स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्या वृद्धांसाठी निवारा केंद्रे उभारण्याच्या सरकारच्या योजनेला गोव्यात बिगर शासकीय संघटनांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात स्मृतिभृंशाने त्रस्त असंख्य वृद्ध असूनही याबाबतीत कुठलीही संघटना पुढे आलेली नाही.
समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी याबाबत खेद व्यक्त करताना या केंद्रीय योजनेसाठी एकाही संघटनेने अद्याप अर्ज केलेला नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, ‘बिगर शासकीय संघटनांना या कामासाठी आवश्यक ती आर्थिक मदत देण्याची सरकारची तयारी आहे. ही केंद्रीय योजना आहे आणि इतर राज्यांमध्ये संघटनांनी निवारा केंद्रे उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. गोव्यात राज्य सरकारच्याही अनेक योजना आहेत परंतु अवघ्याच बिगर शासकीय संघटना कार्यरत असल्याने तसेच त्यांना या कामात रस नसल्याने या संघटना पुढाकार घेत नाहीत. कोणत्याही संघटनेने अर्ज केल्यास 15 दिवसांच्या आत तो निकालात काढण्याची सरकारची तयारी आहे.’
वरील योजनेंतर्गत बिगर शासकीय संघटनांनी जागा शोधावी, कर्मचारीवर्ग घ्यावा, परिचारिका नेमाव्यात, असे नमूद करुन मडकईकर म्हणाले की, निवारा केंद्रे बांधण्यासाठीही निधी देण्याची तरतूद आहे. राज्यात वृद्धाश्रम आहेत. परंतु स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्यांची देखभाल, शुश्रुषा करण्यासाठी विशेष असे एकही निवारा केंद्र नाही. गोव्यात स्मृतिभृंश रुग्णांसाठी काम करणा-या एका संघटनेच्या दाव्यानुसार राज्यात सुमारे ५ हजार असे त्रस्त रुग्ण आहेत. गोवा आणि केरळमध्ये वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. २0११ च्या जनगणनेनुसार गोव्यात एकूण लोकसंख्येच्या ११.२ टक्के लोक ६0 वर्षे वयावरील होते तर केरळमध्ये हा आकडा १२.३ टक्के इतका आहे.
गोव्यात काँग्रेस सरकार सत्तेवर असताना अशा रुग्णांसाठी खास केंद्रे उघडण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. ज्या कुटुंबात अशा व्यक्ती आहेत त्यांना हाताळण्यासाठी कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
काही वर्षांपूर्वी डिमेंशिया सोसायटी आॅफ गोवा या संघटनेची गोमेकॉच्या न्युरो सर्जरी विभागाच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना झाली. डॉ. अमित डायस यांनी केलेल्या अभ्यासानुसार ६0 पेक्षा अधिक वय असलेल्या २.९ टक्के तर ८0 पेक्षा जास्त वय असलेल्या १२.५ टक्के वृद्धांना स्मृतिभृंशानं ग्रासले आहे. देशभरात ४0 लाख वृद्ध या आजाराने त्रस्त आहेत आणि आपल्या बाबतीत काय घडते आहे हे त्यांना माहीतदेखील नाही.