जुवारी पुल आयकॉन ठरेल, पर्यटन व्यवसायाचे आकर्षण बनेल - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 05:52 PM2018-06-12T17:52:36+5:302018-06-12T17:52:36+5:30
गोव्यात साकारत असलेला जुवारी पुल हा आयकॉन ठरेल. जुवारी पुलावर जाण्यासाठी लिफ्टचीही व्यवस्था असेल. गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे ते एक मोठे आकर्षण बनेल, असा विश्वास केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे सांगितले.
पणजी : गोव्यात साकारत असलेला जुवारी पुल हा आयकॉन ठरेल. जुवारी पुलावर जाण्यासाठी लिफ्टचीही व्यवस्था असेल. गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे ते एक मोठे आकर्षण बनेल, असा विश्वास केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे सांगितले.
पणजीतील मांडवी नदीवर बांधण्यात येणा-या तिस-या पुलाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मांडवी पुलाचा शेवटचा स्लॅब, एस27 हा गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी लावण्यात आला. त्यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, की मांडवी पुल राष्ट्रीय महामार्गावर येत असला तरी, या पुलाचे काम गोवा सरकार स्वखर्चाने करील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला भेटून सांगितले होते. त्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती व आम्ही ती दिली. मात्र पुलाचे अर्धे काम झाल्यानंतर पर्रीकर माझ्याकडे पुन्हा आले व राज्य सरकारसमोर आर्थिक अडचण आल्याचे नमूद केले. आर्थिक मदतीची त्यांनी केंद्र सरकारकडे अपेक्षा व्यक्त केली. मी हा विषय राष्ट्रीय महामार्ग मंत्रलयाच्या अधिका-यांकडे मांडला असता, अधिका-यांनी आर्थिक मदतीसाठी मान्यता दिली नाही, कारण स्वखर्चाने हे काम करण्याची ग्वाही अगोदरच गोवा सरकारने दिली होती. मात्र मांडवीवर तिसरा पुल व्हावा हे पर्रीकर यांचे स्वप्न असल्याने आपण अधिका-यांचा सल्ला ओव्हररूल केला व मांडवी पुलासाठी 50 टक्के अर्थसाह्य मंजुर केले.
मंत्री गडकरी म्हणाले, की मांडवी व जुवारी हे दोन्ही पुल गोव्याच्या पर्यटनासाठी वैशिष्टय़ ठरतील. जुवारी पुलावर लिफ्टने जाऊन पूर्ण गोव्याचे दर्शन घेता येईल. गोव्यात रस्ते, पुल वगैरे जी कामे केंद्राने हाती घेतली आहेत, त्यापैकी बहुतांश कामे वेळेत पूर्ण होतील. मडगाव बायपासबाबत जी समस्या आली होती, त्यावर आम्ही तोडगा काढला आहे, त्यामुळे तिथे यापुढे पाणी साचणार नाही. कधी वनविषयक मान्यता मिळण्यासाठी तर कधी भू-संपादन होण्यासाठी विलंब लागतो पण जुवारी पुलाचे कामही ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.
गडकरी म्हणाले, की गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने झाडे लावण्यास आपण सरकारला सांगितले आहे. नवी बांधकामे करताना बरीच झाडे कापली गेली आहेत. पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सात-आठ वर्षाची तयार असलेली झाडे लावावीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हरित होतील. अगदी तयार झाडे आम्ही उपलब्ध करून देऊ. महाराष्ट्रात काही राष्ट्रीय महामार्गाच्याबाजूने बरीच झाडे लावली गेली आहेत. प्रत्येक मंत्री, आमदार, एनजीओंनी काही झाडे दत्तक घ्यावीतय
गोवा-मुंबई महामार्गाविषयी बोलताना गडकरी म्हणाले, की येत्या डिसेंबरनंतर व मार्चपूर्वी त्या महामार्गाचे उद्घाटन केले जाईल. गडकरी यांच्यासोबत यावेळी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, खासदार नरेंद्र सावईकर, मंत्री रोहन खंवटे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर, आमदार दिपक प्रभू पाऊसकर, ग्लेन तिकलो आदी उपस्थित होते.