आणखी एक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर; अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 07:00 PM2019-10-18T19:00:29+5:302019-10-18T19:01:44+5:30

उद्योगाकडील जमीन परत घ्यावी; उद्योग मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

zuari industry in goa on the verge of closure | आणखी एक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर; अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

आणखी एक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर; अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

Next

पणजी : जुवारी उद्योग जर बंद होणार असेल, तर ते धक्कादायकच आहे. मात्र उद्योग बंद केला तर लगेच सरकारने जुवारीला दिलेली 1 हजार हेक्टर जमीन परत घ्यावी अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करत असल्याचे उद्योग मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.

जुवारी उद्योग बंद होणार काय असे विचारले असता, मंत्री राणे म्हणाले, की जुवारी उद्योग बंद केला जात असल्याचे आपल्याला अधिकृतरित्या कंपनीने कळविलेले नाही. मी मुख्य सचिवांकडून त्याविषयी ऐकले आहे पण माझ्यापर्यंत जुवारी कंपनीकडून काहीच पत्रव्यवहार आलेला नाही. जुवारी उद्योग बंद होणे हे धक्कादायक आहे, कारण बऱ्याच नोकऱ्या त्यावर अवलंबून आहेत. उद्योग बंद झाल्यास बेरोजगारी वाढेल. मात्र कंपनीने उद्योग बंद केला व शिल्लक राहिलेल्या जमिनीत रियल इस्टेट व्यवसाय केला असे होऊ नये म्हणून सरकारला पाऊले उचलावी लागतील.

मंत्री राणे म्हणाले, की मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी जुवारीसाठी जमीन दिली होती. गोव्यात एक मोठा उद्योग उभा रहावा या हेतूने जुवारीला 1 हजार हेक्टर जमिन दिली गेली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत याविषयी योग्य तो निर्णय घेतीलच. तथापि, माझी विनंती की, सरकारने ही जमीन परत घ्यावी. आम्ही व्यवस्थापनाशी बोलायला हवे. कंपनी बंद करून ते गेले व मग त्या जमिनीचा वापर रियल इस्टेट व्यवसायासाठी केला गेला असे होऊ नये. ती जमीन अत्यंत मोलाची असून तिथे सरकारी प्रकल्प तरी आणता येतील. ती जमीन सरकारने परत घेतल्यास सरकारला अनेक उपक्रम तिथे सुरू करता येतील.
 

Web Title: zuari industry in goa on the verge of closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.