येत्या एप्रिलपर्यंत झुवारी पूल पूर्ण होणारच- दीपक पाऊसकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:50 PM2020-06-23T18:50:31+5:302020-06-23T18:51:17+5:30
मगो पक्षातून भाजपात आम्ही प्रवेश केला तो पूर्णपणे कायदेशीर असून त्यामुळे घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन झालेले नाही, अशी प्रतिक्रिया पाऊसकर यांनी व्यक्त केली.
मडगाव: कोरोना महामारी आणि चिनी आक्रमण यात नव्या झुवारी पुलाचे काम रखडले असले तरी येत्या एप्रिल महिन्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणारच अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली आहे.
या पुलासाठी चिनी सल्लागार नेमला गेला होता. काही सामानही चीन मधून आणायचे आहे. सध्या चिनी मालावर बंदी घातल्यामुळे काम बंद पडले आहे. मात्र यावर केंद्र सरकार लवकरच पयार्यी तोडगा काढेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी यापूर्वी जे कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते. त्या 1115 कामगारांना, कामगार सोसायटीच्याखाली कामावर कायम करण्यात आले आहे. त्या कामगारांना पाऊसकर यांनी नियुक्तीपत्रे दिली. यावेळी माजी आमदार दामू नाईक, नगरसेवक रुपेश महात्मे, केतन कुरतरकर भाजप मंडळाचे शर्मद रायतूरकर, नवीन पै रायकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते अनिल रिंगणो उपस्थित होते.
यावेळी, साळावली जलवाहिनीच्या दुरुस्तीवर 100 कोटी रुपये खर्च करणार असे पाऊसकर यांनी सांगितले. मडगाव आणि फातोर्डा मतदारसंघातील रस्त्याचे डिसेंबरपर्यंत हॉटमिक्स डांबरीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा प्रवेश कायदेशीरच
मगो पक्षातून भाजपात आम्ही प्रवेश केला तो पूर्णपणे कायदेशीर असून त्यामुळे घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन झालेले नाही, अशी प्रतिक्रिया पाऊसकर यांनी व्यक्त केली. आमच्या बरोबर मगोच्या कार्यकारिणीचे सदस्यही फुटले आहेत. त्यामुळे आम्हाला कुठलीही भीती नाही असा दावा त्यांनी केला. मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर यांच्याविरूद्ध अपात्रता याचिका दाखल केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर पाऊसकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.