गोर्रे येथील संस्थेचा 1 कोटी 75 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 09:47 PM2022-10-15T21:47:30+5:302022-10-15T21:48:47+5:30
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोरे यांचे संचालक व्यवस्थापक मंडळ ग्रेडर यांनी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला एकूण धानसाठा खरीप हंगाम १४५८०.४० तसेच रब्बी हंगाम ३१०१५.४० क्विंटल २०१९-२० मधील धान खरेदीच्या वेळी संस्थेने असे एकूण ४५५९५.८० क्विंटल खरेदी केले होते. त्यापैकी ३६८३२ क्विंटल धानाचा पुरवठा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील धान खरेदीचे एका मागून एक घोटाळे पुढे येत असून शनिवारी (दि.१५) आदिवासी महामंडळाने सालेकसा तालुक्यातील गोर्रे येथील आदिवासी धान खरेदी संस्थेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार केल्याचे माहीत होताच संस्थेचे अध्यक्ष व इतर संचालक आधीच फरार झाले आहेत. त्यांचा शोध सालेकसा पोलिसांनी सुरू केला आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोर्रे येथील अध्यक्ष व इतर संचालक मंडळ व्यवस्थापक ग्रेडर यांनी संगनमताने महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक शासनाचे धानाचे अपहार केल्याचे विभागाने केलेल्या चौकशीत पुढे आले. याप्रकरणी सहकारी संस्था गोर्रे येथील अध्यक्ष संतोष सदनलाल मडावी रा. मरकाखांदा व इतर संचालक शिवाजी कोसमे रा. सीतेपाला, अरुण मनमोनी फुंडे, सिंधीटोला, जयलाल पटले, गोरे, हिरामण जिंदाफोर, सीतेपाला, झाडू गावड-जोशीटोला, खोदूलाल टेकाम, शिकारीटोला, रामजी सिरसाम, मानागड, अनिल फुंडे सिंधीटोला, मुन्जा इंगळे, चेतन जुगनाखे, गजानन मरस्कोल्हे, उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार या सर्वांनी संगनमत करून सालेकसा तालुक्यामध्ये धान खरेदी करण्याकरिता आलेल्या नियुक्तीनंतर करारनाम्यातील नियमांचे उल्लघंन करून धानाचा अपहार केला. तसेच शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर महामंडळाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
८०१३ क्विंटल धानाचा केला अपहार
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोरे यांचे संचालक व्यवस्थापक मंडळ ग्रेडर यांनी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला एकूण धानसाठा खरीप हंगाम १४५८०.४० तसेच रब्बी हंगाम ३१०१५.४० क्विंटल २०१९-२० मधील धान खरेदीच्या वेळी संस्थेने असे एकूण ४५५९५.८० क्विंटल खरेदी केले होते. त्यापैकी ३६८३२ क्विंटल धानाचा पुरवठा करण्यात आला. तर ८७६३.४७ शिल्लक असणे गरजेचे होते. परंतु केलेल्या तपासणीत गोदामामध्ये अंदाजे केवळ १५० क्विंटल शिल्लक असल्याचे आढळले. यावरून ८६१३.४७ क्विंटल किंमत अंदाजे १ काेटी ७७ लाख ३७ हजार ९३८.८० रुपयांच्या धानाचे संगनमताने अपहार करून करून शासनाची फसवणूक केली. संस्थेचे अध्यक्ष व इतर संचालक मंडळ व्यवस्थापक ग्रेड यामध्ये संतोष मडावी व इतर १३ जणांविरुद्ध पोलीस स्टेशन सालेकसा येथे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.