जि.प.ने अडविले पाणीपुरवठाच्या देखभाल दुरुस्तीचे १ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:27 AM2021-03-24T04:27:16+5:302021-03-24T04:27:16+5:30
गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे १ काेटी ५ लाख रुपये जिल्हा परिषदेने न दिल्यामुळे ही योजना ...
गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे १ काेटी ५ लाख रुपये जिल्हा परिषदेने न दिल्यामुळे ही योजना चालविण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ही योजना ३१ मार्च २०२१ पासून बंद करण्यात येत असल्याचे आणि त्यामुळे या योजनेद्वारे ५० हजार नागरिकांना होणारा शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार नसल्याचे लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिंग सर्विसेस प्रा.लि. कंपनीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे काम लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिंग सर्विसेसला १५ जून २०१८ ते १५ जून २०१९ पर्यंत दिले होते. मुदत संपल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूचनेनुसार ह्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू ठेवले. परंतु आक्टोबर २०१९ पासून मार्च २०२१ अखेर झालेल्या कामाची देयके लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिंग सर्विसेसला मिळाली नाहीत. सध्या कोरोनाने थैमान घातलेले आहे. यामुळे लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिंग सर्विसेस ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडील मनुष्यबळ, ऑपरेटर, स्टाफ व तांत्रिक स्टाफ हे सर्व अडचणीत आले आहेत. त्यामुळे योजना चालू ठेवणे अवघड आहे. लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिंग सर्विसेसने वेळोवेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्र देऊनही आर्थिक तरतुदीची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे १८ महिन्यांचे १ कोटी ५ लाख रुपये जिल्हा परिषदेकडे थकीत आहेत. त्यामुळे ही योजना चालविण्यास लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिंग सर्विसेसने नकार देत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्र दिले आहे. आमगाव व सालेकसा तालुक्यांतील ४७ गावांतील ५० हजार नागरिकांना शुद्ध पाणी मिळत असल्याने त्या ५० हजार नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ३१ मार्चपासून या योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले आहे.