भंडारा येथील घटनेत १ दिवसाच्या बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:08+5:302021-01-10T04:22:08+5:30
गोंदिया : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षाला आग लागून दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ...
गोंदिया : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षाला आग लागून दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ९) घडली. या घटनेत जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील एक दिवसाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याने मातेसह तिच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. एक दिवसापूर्वी मुलगी झाल्याच्या आनंदात कुटुंबीय असताना दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची वार्ता आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून ते अद्यापही यातून सावरलेले नाहीत.
प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव येथील सुषमा पंढरी भंडारी यांना प्रसूतीसाठी ८ जानेवारीला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याच दिवशी त्यांची प्रसूती नार्मल झाली. पण बाळाने पोटात संडास केल्याने सायंकाळी ७ वाजता रुग्णालयाच्या नवजात शिशूच्या अतिदक्षता गृहात दाखल करण्यात आले. यानंतर नवजात बालिकेवर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास रुग्णालयातील नवजात शिशूच्या अतिदक्षता कक्षाला शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत एकूण दहा बालकांचा मृत्यू झाला. त्यात सुषमा भंडारी यांच्या एक दिवसाच्या बालिकेचासुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला. एक दिवसापूर्वीच जन्म झालेल्या बालिकेचा या घटनेत मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांनासुध्दा मोठा धक्का बसला आहे. भंडारी कुटुंबाने मुलगी झाल्याची आनंदाची बातमी आपल्या सर्व नातेवाईकांना दिली. सर्व कुटुंबीयसुध्दा आनंदात होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना बालिकेच्या मृत्यूची बातमी देण्याची वेळ आली. बालिकेचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अर्जुनी मोरगाव येथे रुग्णवाहिकेने पाठवून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात मृत बालिकेवर अर्जुनी मोरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
.....
मातेचा हंबरडा अन् सारेच स्तब्ध...
नऊ महिने आपल्या पोटच्या गोळ्याला जिवापाड जपले, यानंतर ती सुखरूप या जगात आली. डॉक्टरांनीसुद्धा सर्व काही व्यवस्थित होईल असा धीर दिला. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता थोडी कमी झाली होती. पण दुर्दैवी घटनेत त्या एक दिवसाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याने मातेने हंबरडा फोडला होता. तिच्या कुटुंबीयांनासुध्दा अश्रू आवरणे कठीण झाले होते. तर ही सर्व परिस्थिती पाहून उपस्थितांचे डोळेसुद्धा पाणावले होते. काही क्षण सारेच स्तब्ध झाले होते.