१ लाख २० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 06:08 PM2024-04-24T18:08:59+5:302024-04-24T18:09:58+5:30
Gondia : १९५९ शेतकरी प्रतीक्षेत: २३५ कोटी ७६ लाख रुपये झाले जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील महायुती सरकारने गेल्यावर्षी नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात धानाला प्रतिहेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली होती. शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार होता. यासाठी जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८१४ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आतापर्यंत १ लाख २० हजार ८५५ शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर बोनसचे २३५ कोटी ७६ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून हमीभावाने धान खरेदी केली जाते. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या व ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून प्रतिक्विंटल बोनस दिला जातो. पण गेल्या वर्षीपासून शासनाने प्रतिक्विंटलऐवजी प्रतिहेक्टरी बोनस देण्यास सुरुवात केली.
मागील वर्षी प्रतिहेक्टर १५ हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस दिला. तर यंदा प्रतिहेक्टर २० हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस दिला. यासाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणे करणे अनिवार्य होते. याकरिता जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८१४ शेतकरी पात्र ठरले.
या शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी शासनाने गोंदिया जिल्ह्याकरिता २३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यापैकी आतापर्यंत १ लाख २० हजार ८५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित १९५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले.
रब्बीची धान खरेदी अडचणीत
रब्बी हंगामातील धान पुढील महिन्यात बाजारपेठेत विक्रीस येण्यास सुरुवात होईल. पण अद्यापही खरिपातील धानाची उचल झालेली नाही. त्यामुळे रब्बी हंगामात ठेवलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न फेडरेशनपुढे डररानपुढ निर्माण झाला आहे. त्यामुळेच अद्याप रब्बीत किती धान खरेदी केंद्र सुरू होणार हे निश्चित झालेले नाही.