१ लाख ३० हजार शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:35+5:302021-06-10T04:20:35+5:30
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ...
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. मात्र सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने मागीलवर्षी खरीप हंगामात ३३ लाख क्विंटल, तर आदिवासी विकास महामंडळाने २९ लाख क्विंटल धान खरेदी केली होती. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शासकीय हमीभावासह बोनस मिळून शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २५१० रुपये दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री न करता शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली. त्यामुळेच मागील खरीप हंगामात दोन्ही खरीप हंगामात दोन्ही विभागाच्या केंद्रावर विक्रमी ६२ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली. धानाच्या बोनसपोटी शेतकऱ्यांना जवळपास २३० कोटी रुपये देणे बाकी आहे. मात्र ही रक्कम अद्यापही न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांना खरीप हंगामात शेतीची कामे करण्यासाठी अडचण जात आहे. कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत असल्यानेच शेतकऱ्यांना बोनस वाटपास विलंब होत असल्याची माहीती आहे.
.............
रब्बीची खरेदी कासवगतीने
खरीप हंगामातील धानाची अद्यापही उचल झाली नसल्याने रब्बी हंगामातील धान खरेदी अद्यापही कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीसुध्दा अडचण होत आहे. धानाची विक्री करण्यासाठी खरेदी केंद्राची पायपीट करायची की खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीची कामे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे.
.......
५७३ राईस मिलर्सचे करारनामे ७० जणांनी केली उचल
मागील खरीप हंगामातील धानाची भरडाईसाठी उचल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५७३ राईस मिलर्ससह करारनामे केले; पण यापैकी आतापर्यंत केवळ ७० जणांनी धानाची उचल केली आहे. त्यामुळे अद्यापही धानाची गोदामे रिकामी झालेली नाहीत. त्यामुळे रब्बीतील धान खरेदी अडचणीत आली आहे.