मालगाडीच्या धडकेत वाघाचा १ बछडा ठार, १ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:09+5:302021-03-09T04:32:09+5:30

गोंदिया : वाघिणीसह तिचे तीन बछडे रेल्वे रुळ पार करीत असताना बल्लारशाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीने दिलेल्या धडकेत १ बछडा ...

1 tiger calf killed, 1 seriously injured | मालगाडीच्या धडकेत वाघाचा १ बछडा ठार, १ गंभीर

मालगाडीच्या धडकेत वाघाचा १ बछडा ठार, १ गंभीर

Next

गोंदिया : वाघिणीसह तिचे तीन बछडे रेल्वे रुळ पार करीत असताना बल्लारशाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीने दिलेल्या धडकेत १ बछडा ठार तर १ बछडा जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.८) सकाळी ६ वाजताच्या सुमारास गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावरील तिरोडा तालुक्यातील गराडा गावाजवळ घडली.

गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गालगतचा बराच भाग हा नवेगावबांध-नागझिरा अभयारण्य लगत आहे, त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांची वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वीच हावडा-मुंबई मार्गावर रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता एक बछडा ठार तर एक बछडा गंभीर झाल्याची घटना घडली. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या दरम्यान नागझिरा अभयारण्यातील टि-१४ वाघिणी आपल्या तिन्ही बछड्यांसह पांढरी-गराडा परिसरात वावरत होती. दरम्यान, आपल्या बछड्यांसह गोंदिया-बल्लारशा मार्गावरील रेल्वे रुळ पार करीत असताना बल्लारशाकडून गोंदियाकडे येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. यात एक बछडा ठार झाला तर एक बछडा जखमी झाल्याची माहिती आहे. टि-१४ वाघिण गेल्या दोन तीन वर्षांपासून या भागात वास्तव्यास आहे. तिचे तिन्ही बछडे हे सहा ते आठ महिन्यांचे होते. एका बछड्याचा मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान, या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराज सिंह, सहायक उपवनसंरक्षक आर.आर.सदगिर,नागझिरा अभयारण्याच्या उप-संचालक पुनम पाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, वन विभागाचेे क्षेत्रसहायक धुर्व दोनोडे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली.

.........

अनेक वन्य प्राण्यांचा बळी जाऊनही दखल नाही

रेल्वे आणि वाहनाच्या धडकेत मागील वर्षभरात पंधरा ते वीस वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, तसेच याला प्रतिबंध लावून उपाययोजना करण्याची मागणी अनेक दिवसांपासून वन्यप्रेमींकडून केली जात आहे; पण यानंतरही वन्यजीव विभाग, वन विभाग व रेल्वे विभाग यांच्याकडून कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी, वन्य प्राण्यांचा नाहक बळी जात आहे.

.......

Web Title: 1 tiger calf killed, 1 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.