दाम दुप्पटच्या नावाखाली फसवणूक; बालाघाट जिल्ह्यातून १० जण अटकेत, हादरे मात्र गोंदियात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 04:35 PM2022-05-19T16:35:27+5:302022-05-19T16:40:09+5:30
बालाघाट पोलिसांनी १६ मे रोजी लांजी येथे धाड टाकून १० जणांना अटक केली. ही कारवाई होताच जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना याचे हादरे बसले आहेत.
गोंदिया : सहा महिन्यात रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या नावाखाली मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथे मागील सहा वर्षांपासून हा व्यवसाय सुरू होता. मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील अनेकजणांनी यात गुंतवणूक केली होती. गोंदिया जिल्ह्यातील काही व्यापारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी यात लाखो रुपये गुंतविल्याची माहिती आहे. दरम्यान, बालाघाट पोलिसांनी १६ मे रोजी लांजी येथे धाड टाकून १० जणांना अटक केली. ही कारवाई होताच जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना याचे हादरे बसले आहेत.
बालाघाट पोलिसांनी कारवाई दरम्यान १० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १६ मोबाईल व गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणात बोलेगाव लांजी येथील हेमराज आंबेडारे, रमेश मंसुरे, राकेश मंसुरे, प्रदीप कंकरायने, ललिता वैष्णव, राहुल बापुरे, रामचंद्र कालबले, अजय तिडके, शिवजित चिले, मनोज सोनेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील व्यापारी आणि अन्य गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती आहे.
सहा महिन्यात रक्कम दुप्पट
बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर येथे मागील सहा वर्षांपासून सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्याचा व्यवसाय सुरू आहे. ज्यांनी यात गुंतवणूक केली होती, त्यांना सहा महिन्याचा कालावधी होताच दुप्पट रक्कमदेखील परत करण्यात आली. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांवर विश्वास अधिक दृढ झाल्याने अनेकजण गुंतवणूक करण्यासाठी लांजी व किरणापूर येथे पोहोचत होते.
चार तालुक्यांतील गुंतवणूकदारांनी केली सर्वाधिक गुंतवणूक
सहा महिन्यात रक्कम दामदुप्पट होत असल्याने गोंदिया, सालेकसा, आमगाव, गोरेगाव येथील व्यापारी आणि काही सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक लांजी व किरणापुरे येथील व्यावसायिकांकडे केल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी कारवाई करताच लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सहा महिन्याच्या मुदतीचा धनादेश दिला जात होता आधीच
सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्यासाठी गुंतवणूकदारांनी रक्कम जमा केल्यानंतर संबंधित व्यावसायिकांकडून सहा महिन्याच्या मुदतीनंतर दुप्पट रक्कमेचा धनादेश गुंतवणूकदारांना दिला जात होता. यातून अनेकजण लखपती झाल्याची माहिती आहे.
आरोपींना ३० मेपर्यंत न्यायालयीन कोठडी
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना बालाघाट येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या अटक केलेल्या आराेपींना न्यायालयाने ३० मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी केली आहे. तर या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.
गुंतवणूक नेमकी कुठे करायचे?
बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर येथे मागील सहा वर्षांपासून सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्याचा व्यवसाय सुरू होता. मागील सहा वर्षांपासून हा व्यवसाय सुरळीतपणे सुरू होता शिवाय कुणीही तक्रार केली नव्हती. मात्र, हे व्यावसायिक पैशांची नेमकी कुठे गुंतवणूक करून सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देत होते, हा पोलिसांसाठीही संशोधनाचा विषय आहे.