भाजीपाल्याच्या उत्पादनातून घेतले १० लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:21 PM2019-04-29T21:21:38+5:302019-04-29T21:22:03+5:30
दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन ...
दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेवून वर्षाकाठी १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तसेच कनिष्ठ शेती म्हणणाºयापुढे आदर्श निर्माण केला आहे. टिटू जैन असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
टिटू जैन यांची पालेवाडा (हेटी) येथे स्वत:ची १२.५० एकर शेती आहे.या शेतजमिनीत त्यांनी, मिरची, वांगे, काकडी, कारली, टमाटर, चवळीच्या शेंगा, भेंडी आदी भाजीपाला लावला आहे. पूर्वीच्या काळात शेतीला जोडधंदा म्हणून लोकं इतर व्यवसायाकडे वळायचे. मात्र टिटू जैन यांचे वेगळेपण इथे पहायला मिळते. स्वत: व्यवसायीक असताना सुध्दा ते शेतीकडे वळले. टिटू जैन यांनी सांगितले की मित्राच्या मार्गदर्शनात त्यांनी शेतीचे धडे घेतले.शेती करायची ही मनात जिद्द होती, ती जिद्द पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला चिचगाव येथील एका शेतकऱ्याची साडेतीन एकर शेती भाडेतत्वावर घेतली. सतत तीन वर्ष शेती करुन शेतीत नफा मिळविला. पुढे स्वत:ची पालेवाडा येथे शेती घेवून शेतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. शेतीतून निघणाऱ्या भाजीपाल्याची सुरूवातील स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, जबलपूर या ठिकाणी बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करण्यास सुरूवात केलीे. जैन यांनी शेतात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे लावले आहेत. त्यामुळे बºयाच अंशी नुकसानीवर आळा बसला आहे.सकाळी ६ वाजता बाजारपेठेत भाजीपाला विक्रीेसाठी नेणे, त्यानंतर शेतीत पूर्ण वेळ देऊन, पुन्हा बाजारपेठेत माल विक्रीस नेणे असा नित्यक्रम जैन यांचा आहे.
३२ कुटुंबाचा उदरनिर्वाह
जैन यांच्या शेतात वर्षभर ३२ कुटुंबांना रोजगार प्राप्त होत आहे. त्यामुळे स्थानिकांना जैन यांच्यामुळे रोजगार प्राप्त झाला आहे. सेंद्रिय शेतीचा वापर करुन त्यांनी दीड एकरात गहू व भाताचे उत्पादन घेवून सेंद्रिय शेती उत्तम असल्याचे लोकमतशी बोलतांना सांगितले.
खताची निर्मिती शेतातच
टिटू जैन यांनी सदासावलीचे पान, लिंबाचे पान, सिताफळाचे पान व इतर पानाचे मिश्रण करुन पाण्यात उकळले व त्यांचा काढा काढून स्प्रेद्वारे झाडावर फवारणी केली. त्यामुळे रासायनिक खताचा वापर निम्यावर आल्याचे त्यांनी सांगितले.
आज सर्वांनी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. पारंपारिक शेतीला बगल द्या, नुसती धानाची शेती केल्याने फायदा होत नाही तर शेतीत वेगवेगळे प्रयोग केल्यास शेतीतून निश्चित फायदा होतो.
-टिटू जैन, शेतकरी, गोरेगाव