खासगी शाळांची १० टक्के शुल्कवाढीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:28 PM2019-04-29T21:28:16+5:302019-04-29T21:29:13+5:30

आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. पालकांच्या नेमक्या याच गरजेचा फायदा शहरातील काही नामांकित शाळांनी घेण्यास सुरूवात केली आहे.

10% of private schools forced to pay | खासगी शाळांची १० टक्के शुल्कवाढीची सक्ती

खासगी शाळांची १० टक्के शुल्कवाढीची सक्ती

Next
ठळक मुद्देपालकांचा तीव्र विरोध : शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका, कारवाई करणार कोण?

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. पालकांच्या नेमक्या याच गरजेचा फायदा शहरातील काही नामांकित शाळांनी घेण्यास सुरूवात केली आहे. दरवर्षी प्रवेश शुल्कात १० टक्के सक्तीने वाढ केली जात आहे. तसेच याला विरोध करणाऱ्या पालकांना तुमच्या पाल्यांना आमच्या शाळेत शिकवू नका, असे उलट उत्तर दिले जात आहे. खासगी शाळांच्या सक्तीमुळे पालकांची मात्र आर्थिक कोंडी झाली आहे.
मागील तीन चार वर्षांपासून खासगी शाळांच्या मनमानी धोरणात चांगलीच वाढ झाली आहे. या नामाकिंत खासगी शाळांनी आमच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर पाठ्यपुस्तके, गणवेश आणि जोडे आमच्या शाळेतून खरेदी करावी लागेल असा अलिखीत नियमच तयार केला आहे. दरवर्षी शैक्षणिक शुल्कात दहा टक्के वाढ आणि पाठपुस्तके आणि शाळेतून गणवेश घेण्याच्या सक्तीमुळे पालकांची अक्षरक्ष: लूट केली जात आहे. मात्र आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालक सुध्दा हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद व इतर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेरुन पुस्तके खरेदी करावी लागतात. सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे. या अभ्यासक्रमांची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहे. पण, खासगी इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी कमिश्नखोरीकरिता शाळेतच पाठपुस्तके व इतर साहित्याचे दुकाने लावून तिथूनच पाठपुस्तकांची खरेदी करण्याची सक्ती केली आहे.
शाळांमधून पुस्तके घेतली नाही तर पालकांना धमकाविण्याचे प्रकार सुध्दा काही शाळांमध्ये सध्या सुरु आहेत. त्यामुळे पालक सुध्दा आपला पाल्य नामाकिंत शाळेतील प्रवेशापासून वंचित राहू नये, त्याला वर्षभर शाळा व्यवस्थापनाकडून त्रास व्हायला नको, म्हणून पालक देखील हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत आहे. मात्र दरवर्षी खासगी शाळांमध्ये पाठपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीच्या नावावर अक्षरक्ष: लूट केली जात आहे.
ज्या पाठ्यपुस्तकांचे दर बाजारपेठेत कमी आहे. तीच पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना अतिरिक्त दर आकारुन विक्री केली जात आहे. एखाद्या पालकांने यावर ओरड केल्यास त्यांना परवडत नसेल तर शाळेत प्रवेश घेवू नका, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे पालकांचा सुध्दा नाईलाज आहे.
मागील वर्षी शैक्षणिक सत्रादरम्यान खासगी शाळांनी पाठपुस्तकांच्या नावावर सुरू केलेल्या लूटमारी विरोधात पालकांनी आवाज उठविल्यानंतर न्यायालयाने दखल घेत शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी सक्ती न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही खासगी शाळांमधून दुकानदारी बंद करुन विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास सांगितले जात आहे. सक्तीच्या नावावर कमिशनखोरी व पालकांची लूट मात्र कायम आहे.
मूळ किमतीमध्ये खोडतोड
शहरातील एका नामाकिंत खासगी शाळेत सध्या सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अभ्यासक्रमाची पुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली आहे. सीबीेएसई इयत्ता पाचवी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या संचाचे शुल्क ४ हजार ३६० रुपये आकारले जात आहे. मात्र या संचाची बाजारपेठेत किंमत केवळ ३ हजार ५७० रुपये आहे. शाळेने पुस्तकावर प्रिंट केलेल्या किंमतीच्या बाजुला स्टॉम्प मारून त्यावर ८० ते ९० रुपये अतिरिक्त आकारुन स्टॅम्प मारुन एक प्रकारे लूट सुरू केल्याचे चित्र आहे.
शाळेतूनच खरेदीची सक्ती का ?
सीबीएसईसह इतर अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहे. त्यांचे दर देखील शाळांमधून मिळणाºया पुस्तकांपेक्षा कमी आहे. मात्र खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतानाच शाळेतून पाठ्यपुस्तके, गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागेल, अशी सक्ती केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना नाईलाजास्तव अतिरिक्त पैसे मोजून शाळेतूनच पुस्तके खरेदी करावी लागत आहे.
नवीन गणवेश व बुटांची सक्ती
पाठपुस्तकांच्या सक्तीसह दरवर्षी गणवेशात शाळांकडून बदल केला जात आहे. तसेच कॉन्व्हेंटपासून इयत्ता आठव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळे गणवेश आणि दरवर्षी नवीन बुट घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे पालकांना दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पालकांचे बजेट बिघडले
खासगी शाळांच्या प्रवेश शुल्कात व पाठपुस्तकांच्या दरात दरवर्षी वाढ केलीे जात आहे. केजी वन किंवा केजी टू मध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये शुल्क आणि पाठपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे ८ ते १० हजार रुपये लागत असल्याने पालकांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.
ठराविक दुकानातूनच खरेदी
खासगी शाळांमध्ये पाठपुस्तके शाळांमधून खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. गोंदिया शहरात ६० वर खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून यामध्ये २२ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. एका विद्यार्थ्याच्या पाठपुस्तकांच्या संचामागे काही शाळा हजार रुपयांच्यावर शुल्क आकारात आहे. तर काही शाळांनी विशिष्ट दुकाने निश्चित करुन स्वत:चे कमिशन ठरविले आहे.
सोशल मीडियावरुन संताप
खासगी शाळांकडून शाळांकडून दरवर्षी १० ते १५ टक्के शैक्षणिक शुल्क वाढ केली जात आहे. यामुळे पालकांना दरवर्षी आर्थिक भुर्दंड बसत आहे. याचा शहरातील पालकांनी विविध व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरुन विरोध केला आहे. तसेच गोंदिया विधानसभा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून या विरोधात लढा देण्यासाठी शिक्षक हक्क संघर्ष समिती गठीत केली आहे. खासगी शाळांनीे मनमानी बंद न केल्यास रस्त्यावर उतरुन याचा विरोध करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात त्यांची बैठकही पार पडली.
शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका
खासगी शाळांकडून पाठपुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करुन पालकांची लूट केली जात आहे. याबाबत पालकांची ओरड सुध्दा सुरू आहे. मात्र अद्यापही शिक्षण विभागाने याची साधी चौकशी करुन एकाही शाळेवर कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांप्रती पालकांमध्ये रोष व्याप्त आहे.

खासगी शाळांकडून पाठ्यपुस्तकांची शाळेतून खरेदी करण्याच्या नावावर लूट केली जात आहे. हा प्रकार अयोग्य असून यावर शिक्षण विभागाने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. मात्र दुदैवाने त्यांचेच याकडे दुर्लक्ष झाले आहे.
- शिक्षण हक्क संघर्ष समिती गोंदिया

Web Title: 10% of private schools forced to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.