१० हजार मुले आधार नोंदणी विनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:41 AM2017-07-21T01:41:18+5:302017-07-21T01:41:18+5:30
सर्वांसाठी आधार नोंदणी ही अत्यावश्यक व बंधनकारक असतानाच जिल्ह्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील
६ ते १८ वर्षे वयोगट : विशेष मोहीम राबविण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्वांसाठी आधार नोंदणी ही अत्यावश्यक व बंधनकारक असतानाच जिल्ह्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील तब्बल ९ हजार ८१३ मुले (मुले-मुली) आधार नोंदणी विनाच आहेत. आज प्रत्येकच कामासाठी आधारकार्ड असणे महत्वाचे झाले असून या मुलांकडे आधारकार्ड नाही. यासाठी मात्र आता पुन्हा आधारकार्ड नोंदणीची विशेष मोहिम राबवून त्यांची नोंदणी करण्याची गरज आहे.
आज शासकीय किंवा खाजगी कार्यालयातील कोमतेही काम असो आधारकार्ड क्रमांक अगोदर विचारला जातो. तुमच्याकडे आधारकार्ड असेल तर त्या आधारेच आज तुमचे काम होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जन्माला आलेल्या चिमुकल्यापासून सर्वांची आधारकार्ड नोंदणी बंधनकारकच करण्यात आली आहे. सुरूवातीला यासाठी शासनाने आधारकार्ड नोंदणीसाठी ठिकठिकाणी शिबिरे लावून नोंदणी करवून घेतली. अशात आतापर्यंत जिल्ह्यातील ९७.३३ नागरिकांची नोंदणी झाल्याची माहिती आहे.
असे असतानाच मात्र, जिल्ह्यातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील ९ हजार ८१३ मुले आधारकार्ड नोंदणी विनाच आहेत. ९६.४५ टक्के मुलांची जिल्ह्यात नोंद झालेली आहे. हे वय शिक्षणाचे असते व शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रांची गरज पडते. मात्र या मुलांकडे आधारकार्ड नसल्याने त्यांना या कामात कोठेतरी अडचण येत असावी यात शंका नाही. करिता या मुलांची आधारकार्ड नोंदणी करण्याची गरज आहे.
यासाठी मात्र शासनाने पुन्हा आधारकार्ड नोंदणीसाठी शिबिरे घेण्याचीही तेवढीच गरज आहे. याशिवाय जिल्ह्यातील आधारकार्ड वंचितांची नोंद होणार नाही व जिल्हा पूणपणे आधारकार्ड नोंद झालेला जिल्हा होणार नाही.