३० वर्षांपासून १०० कुटुंबांना पाण्याची सोय नाही
By admin | Published: May 15, 2017 12:21 AM2017-05-15T00:21:17+5:302017-05-15T00:21:17+5:30
येथील कृष्ण वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सुमारे १०० कूटूंब आहेत. वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याची नळ योजनेद्वारे सोय आहे.
लोकप्रतिनिधींची फक्त आश्वासने : पावसाळ्यातही पाण्यासाठी धावाधाव
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : येथील कृष्ण वॉर्ड क्रमांक ३ मध्ये सुमारे १०० कूटूंब आहेत. वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याची नळ योजनेद्वारे सोय आहे. मात्र दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती या योजनेची आहे. उन्हाळा तर सोडा पावसाळ्यातही या वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत नाही. तर ग्रामपंचायतच्या नळ योजनेलाही पाणी येत नाही. मागील ३० वर्षापासून हाच प्रकार सुरू असून वॉर्डातील १०० कुटुंबीयांची पाण्यासाठी ओरड सुरू आहे.
योजनेला पाणी येत नसले तरीही संबंधीत प्रशासन वर्षापोटी ७०० रुपये नळ कनेक्शनचे घेतात. या १०० घरांना वापरण्याकरीता फक्त एक बोरवेल या वॉर्डामध्ये आहे. त्यामुळे महिलांची पाण्याकरीता रोज सकाळी व संध्याकाळी बोअरवेलवर गर्दी होते. अशात पाण्यासाठी येथे वादावादी व भांडणेही होतात. गेल्या अनेक वर्षापासून कित्येक सरपंच, सदस्य व लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेले. कामापुरते आश्वासने देवून गरीबांच्या विश्वासघातच त्यांनी केला आहे.
सदर वॉर्डातील जनतेला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना गावच सोडून निघून जावे असे वाटत आहे. या वॉर्डामध्ये दिवाबत्तीची सोय नाही, जाण्यायेण्याकरीता मार्ग व्यवस्थीत नाही, सांडपाणी मार्गी लावण्याकरीता गटारी नाही, पिण्याच्या पाण्याकरीता बोअरवेल किंवा नळ योजना जिवंत स्थितीमध्ये उपलब्ध नाही. तरी प्रशासन वर्षापोटी घर कर वसुली करीत असल्याचे वॉर्डवासी सांगतात. करीता संबंधीत प्रशासनाने नुसते आश्वासन देवू नये तर कामे ही करावे व जनतेच्या पिण्याच्या पाण्याची मुबलक सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायतकडे आजघडीला १४ वित्त आयोगातील १९ लाख रुपये जमा आहेत. मात्र गावातील जनतेला पाण्याची सोय उपलब्ध नसताना पडून असलेल्या या पैशांचा उपयोग काय असा सवाल गावकरी करीत आहेत.