१०२ रुग्णवाहिका चालक १९ महिन्यांपासून मानधनापासून वंचित; सहसंचालक तांत्रिकच्या पत्राला केराची टोपली

By नरेश रहिले | Published: October 4, 2023 04:17 PM2023-10-04T16:17:41+5:302023-10-04T16:18:36+5:30

५.५ कोटी येऊनही पैसे दिले जात नाहीत

102 ambulance drivers deprived of wages for 19 months; Kera basket to the letter of the Joint Director Technical | १०२ रुग्णवाहिका चालक १९ महिन्यांपासून मानधनापासून वंचित; सहसंचालक तांत्रिकच्या पत्राला केराची टोपली

१०२ रुग्णवाहिका चालक १९ महिन्यांपासून मानधनापासून वंचित; सहसंचालक तांत्रिकच्या पत्राला केराची टोपली

googlenewsNext

गोंदिया : रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी २४ तास दक्ष असलेल्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांना गेल्या १९ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मानधन जमा करण्याची अनेकवेळा मागणी करण्यात आली; मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका कार्यरत आहे. या रुग्णवाहिकांसाठी ६७ चालक आहेत. गंभीर आजाराने ग्रासलेल्या आणि आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना रुग्णवाहिका सेवा दिली जाते. परंतु, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रुग्णवाहिका चालकांना दर तासाला सतर्क राहावे लागते. यापूर्वी एनएचएममधून रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती होत होती. मात्र, मागील काही वर्षांपासून एनएचएममधून काढून खासगी कंपनीमार्फत नियुक्ती दिली होती. परंतु, त्याविरोधात रुग्णवाहिका चालकांनी आपल्या अधिकारासंदर्भात वाद करून एनएचएम अंतर्गतच वेतन व्हावे ही मागणी केल्याने त्यांना रोजंदारी तत्त्वावर वेतन करण्याचे आदेश सहसंचालक तांत्रिक डॉ. विजय बावीस्कर यांनी दिले आहेत.

रुग्णवाहिका चालकांना १३ हजार ५०० रुपये दिले जात आहेत. त्यापैकी ९ हजार रुपये पीएफ व इतर योजनांतील मानधन कपात करून दिले जात आहेत. तरीही ते वेळेवर मिळत नाहीत. अभियान संचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सक गोंदिया यांना पत्र पाठवून रोजंदारी प्रमाणे वेतन देण्याचे आदेश दिले. परंतु त्यांच्या पत्रावरही जिल्हा आरोग्य अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत. गोंदिया जिल्ह्याला ५ कोटी ५० लाख उपलब्ध झाले असूनही १९ महिन्यांपासून रुग्णवाहिकांना वेतन न देणे ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.

४ दिवसांनंतर कामबंद आंदोलन

गाेंदिया जिल्ह्यातील १०२ क्रमांकावर काम करणाऱ्या वाहन चालकांचे १९ महिन्यांचे वेतन चार दिवसांत त्यांच्या खात्यात जमा न केल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे. आंदोलन झाल्यास आरोग्य यंत्रणाच आजारी पडू शकते. यासाठी वेतन द्या; अन्यथा कामबंद आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शेखर चंद्रिकापुरे, सचिव भूषण उईके, उपाध्यक्ष रवींद्र तिडके, रवी पडोळे, कृष्णा शहारे, राजू वाघाडे, प्रेमानंद लांजेवार, फारूख पठाण, राजेश खिरेकर, पवन काळसर्पे, अल्ताफभाई पठाण, दिनेश बल्ले यांनी दिला आहे.

एका कर्मचाऱ्याला मिळणार ४ लाख

जवळ-जवळ दोन वर्षांचे वेतनच कर्मचाऱ्यांना दिले गेले नाही. गोंदिया जिल्ह्यातील ६७ वाहन चालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. १९ महिन्यांचे वेतन दिल्यास एका कर्मचाऱ्याला ४ लाख रुपये मिळतील.

वेतनाच्या प्रतीक्षेतच चालकाचा मृत्यू

१९ महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनामुळे उपचारासाठी पैसे नव्हते. पोट भरण्यासाठी कर्जाचा डोंगर वाढला. प्रकृती खालावली; परंतु, उपचार घेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन चालकांनी वर्गणी करून उपचारासाठी पैसे दिले. परंतु उपचारासाठी पैसे अपुरे पडल्याने फुटाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालक रवी कमल प्रधान यांचा २८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाल्याची माहिती वाहन चालक संघटनेने दिली आहे.

Web Title: 102 ambulance drivers deprived of wages for 19 months; Kera basket to the letter of the Joint Director Technical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.