ग्रा.पं. निवडणुकीसाठी १०२ लालपरींचे ‘बुकिंग’; गोंदिया, तिरोडासह साकोली आगारातून बसेस

By कपिल केकत | Published: December 15, 2022 03:08 PM2022-12-15T15:08:54+5:302022-12-15T15:16:33+5:30

परिवहन महामंडळाला लक्ष्मीच पावली; निवडणुकीतून कमाईची संधी

102 ST Buses for Gram Panchayat Elections; supply from Gondia, Tirora and Sakoli depot | ग्रा.पं. निवडणुकीसाठी १०२ लालपरींचे ‘बुकिंग’; गोंदिया, तिरोडासह साकोली आगारातून बसेस

ग्रा.पं. निवडणुकीसाठी १०२ लालपरींचे ‘बुकिंग’; गोंदिया, तिरोडासह साकोली आगारातून बसेस

Next

गोंदिया : जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि. १८) निवडणूक घेतली जात आहे. आता निवडणूक म्हटली म्हणजे निवडणूक कर्मचारी व निवडणुकीचे साहित्य ने-आण करण्यासाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीची गरज पडतेच. त्यानुसार, यंदा प्रशासनाने निवडणुकीसाठी १०२ लालपरींचे ‘बुकिंग’ केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारातून लालपरींचा पुरवठा केला जाणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जात असून, यामध्ये जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा काळ सुरू असून, येत्या रविवारी (दि. १८) मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडूनही तयारी सुरू झाली असून, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्यासह ने-आण करावी लागते. यासाठी प्रशासनाकडून नेहमीच राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून लालपरीची मागणी केली जाते. त्यानुसार, यंदाही रविवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १०२ लालपरींची ‘बुकिंग’ करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे लालपरीची चाके लॉकडाउनमध्ये अडकून पडली होती. त्या काळात महामंडळाला कधी नव्हे तेवढा आर्थिक फटका सहन करावा लागला. कोरोनाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडते न पडते तोच महामंडळातील कर्मचारी संपावर गेले. सुमारे ६ महिने सुरू असलेल्या संपामुळे दुसऱ्यांदा महामंडळाला आघात सहन करावा लागला. त्यामुळे महामंडळासाठी मागील वर्षातील या दोन घटना अतिशय वेदनादायी ठरल्या. मात्र २०२२ मध्ये हे सर्व विघ्न संपुष्टात आले असून, लालपरीची चाके पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत फिरू लागली आहेत.

महामंडळासाठी २०२२ आर्थिक लाभाचे

कोरोना व कर्मचारी संप या दोन आघातांचा सामना केल्यानंतर मात्र महामंडळासाठी सन २०२२ हे वर्ष चांगलेच लाभाचे ठरत आहे. या वर्षी महामंडळाचा कारभार सुरळीत सुरू असतानाच दिवाळीत महामंडळाने चांगली कामगिरी करून झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेतली. त्यात आता राज्यातच ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असल्याने महामंडळाच्या तिजोरीवर महालक्ष्मीची कृपाच दिसून येत आहे.

असे केले लालपरींचे ‘बुकिंग’

रविवारी होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून लालपरींचे ‘बुकिंग’ करण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया आगारातून गोंदिया तालुक्याला २५, गोरेगाव तालुक्याला ८, आमगाव तालुक्याला १२, तर सालेकसा तालुक्याला १० अशा एकूण ५५ बसेस पुरविल्या जाणार आहेत. तिरोडा आगाराकडून फक्त तिरोडा आगारासाठीच १७ बसेस पुरविल्या जाणार आहेत, तर जिल्ह्यातील देवरी तालुक्याला ८, अर्जुनी-मोरगाव तालुक्याला १२ व सडक-अर्जुनी तालुक्याला १० अशा एकूण ३० बसेस भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारातून पुरविल्या जाणार आहेत. अशाप्रकारे जिल्ह्याला या तिन्ही आगारांतून एकूण १०२ बसेस पुरविल्या जाणार आहेत.

आगारनिहाय बसेसचा तक्ता

   आगार - बससंख्या- तालुका

  • गोंदिया - ५५ - गोंदिया (२५), गोरेगाव (८), आमगाव (१२), सालेकसा (१०)
  • तिरोडा - १७ - तिरोडा
  • साकोली - ३० - देवरी (८), अर्जुनी-मोरगाव (१२), सडक-अर्जुनी (१०)

Web Title: 102 ST Buses for Gram Panchayat Elections; supply from Gondia, Tirora and Sakoli depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.