१०२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त ३ पोलिसांच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 02:46 PM2021-10-19T14:46:44+5:302021-10-19T14:51:08+5:30
पोलीस चौकी अंतर्गत १०२ गावांचा समावेश आहे. यात सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या गावासाठी केवळ तीन पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी यंत्रणा सपेशल नापास झाली आहे.
गोंदिया : शांतता व सुरक्षितता राखण्याचे महत्त्वाचे कार्य कायद्याद्वारे पोलीस विभागाकडे असते. त्यामुळे गुन्हा व गुन्हेगार, दोन्हीचा बीमोड करता येतो. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज व मुबलक असणे गरजेचे असताना मात्र केवळ तीन पोलीस १०२ गावांना संरक्षण देण्याचा काम करतात. अशावेळी अपराधाला अंकुश लावणे कठीण होते. त्यातही छोट्याशा खोलीत पोलीस चौकी, कित्येक वर्षांपासून ‘नो चेन्ज हिच स्थिती आहे.
आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून परिचित आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला सालेकसा तालुका नेहमी विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला आहे. शासनापासून तर प्रशासनापर्यंत सर्वच स्तरावर सालेकसा तालुक्याकडे पाठ फिरविली जाते. त्यामुळे विकासाच्या रुळावर तालुका आला नाही. लोकप्रतिनिधी आपली खुर्ची वाचविण्यातच गुंग राहतात.
मागील बऱ्याच वर्षांपासून साखरीटोला येथील पोलीस स्टेशनचा प्रस्ताव धूळखात आहे. मात्र, कुणाचेही याकडे लक्ष नाही. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे पोलीस स्टेशन व्हावे, या मागणीला घेऊन प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पोहोचला. मात्र, अजूनपर्यंत प्रस्तावाचे काय झाले हे कळायला मार्ग नाही. पोलीस चौकी अंतर्गत १०२ गावांचा समावेश आहे. यात सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या गावासाठी केवळ तीन पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी यंत्रणा सपेशल नापास झाली आहे.
नागरिकांना पोलीस स्टेशनची प्रतीक्षा
एखादा अपराध घडल्यास पोलीस विभागाला सालेकसा येथून पोहोचण्यास विलंब लागतो. साधा रिपोर्ट देण्यासाठी नागरिकांना सालेकसा पोलीस स्टेशनचा दरवाजा ओलांडावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा तक्रार करण्यापेक्षा नाही दिलेली बरी, असे मानून तक्रार होत नाही. तक्रार झाली ही तरीही तपास करण्यास विलंब होतो, त्यामुळे पोलीस स्टेशनच्या अभावी नागिरक त्रस्त झाले आहेत.
शेकडोच्यावर गावे असताना केवळ तीन पोलीस, पोलीस उपनिरीक्षकांसह पाच पोलीस व एक महिला पोलिसाची आवश्यकता असताना केवळ तीन पोलिसांवर संरक्षण करण्याची जबाबदारी असल्याने त्यातही पोलीस चौकी बऱ्याचदा बंदच राहत असल्याने गुन्हेगारी, अवैध धंदे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस स्टेशन कधी होणार, प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत.