१०,४६३ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा
By admin | Published: May 6, 2016 01:28 AM2016-05-06T01:28:05+5:302016-05-06T01:28:05+5:30
मेडिकल, इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व महाराष्ट्र हेल्थ अॅन्ड टेक्निकल कॉमन एट्रांस टेस्ट (एमएचटी-सीईटी) परीक्षा गोंदिया शहरातील १७ केंद्रांवर गुरूवारी (दि.५) झाली.
गोंदिया : मेडिकल, इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व महाराष्ट्र हेल्थ अॅन्ड टेक्निकल कॉमन एट्रांस टेस्ट (एमएचटी-सीईटी) परीक्षा गोंदिया शहरातील १७ केंद्रांवर गुरूवारी (दि.५) झाली. जिल्हा प्रशासनाने सदर परीक्षेसाठी व्यापक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे परीक्षा शांततेत पार पडली.
सदर परीक्षेसाठी ११ हजार ३०२ परीक्षार्थ्यांनी आवेदन केले होते. मात्र प्रत्यक्षात १० हजार ४६३ परीक्षार्थीच परीक्षेत सहभागी झाले. वेगवेगळ्या कारणांमुळे ८३९ परीक्षार्थी परीक्षेत सहभागी होवू शकले नाही.
यात प्रामुख्याने तीन पेपर घेण्यात आले. फिजिक्स-केमिस्ट्रीच्या पेपरसाठी ४ हजार ६४३ आवेदन होते. त्यापैकी ४ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले. ३३७ विद्यार्थी अनुपस्थित होते. पेपर क्रमांक-२ बॉयलॉजीसाठी ३ हजार १७० आवेदन आले होते. तर ३ हजार ३० विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले. यात परीक्षार्थ्यांची अनुपस्थिती १४० होती. पेपर क्रमांक-३ गणितासाठी ३ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी आवेदन केले होते. यात ३ हजार १२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३६२ विद्यार्थी परीक्षेत उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)
भोवळ येऊन पडली विद्यार्थिनी
महावीर मारवाडी हायस्कूल या केंद्रावर पूजा नामक एक विद्यार्थिनी भोवळ येवून पडली. तिला त्वरित केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ती परीक्षा देण्यापासून वंचित राहिली.