राजेश्वर किरसानच्या खून प्रकरणात ११ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:42+5:302021-07-08T04:19:42+5:30
गोंदिया : तालुक्यातील लोहारा येथील राजेश्वर उर्फ राजू डोमा किरसान (३६) याला मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात २३ जून रोजी दुपारी ...
गोंदिया : तालुक्यातील लोहारा येथील राजेश्वर उर्फ राजू डोमा किरसान (३६) याला मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात २३ जून रोजी दुपारी गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून त्याला बेशुध्द अवस्थेत गाडीत टाकून नेले. यानंतर त्याचा मृतदेह ६ जुलै रोजी बोपाबोडी येथील जंगलात पुरलेल्या अवस्थेत आढळला. दवनीवाडा पोलिसांनी या प्रकरणात ११ जणांवर खून व ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मृतकची पत्नी सेवागन किरसान (३०) हिच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसात भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४४ सहकलम ३१ (१) सहकलम ३ (२) व्ही. ए. २०१५ (३) (२) (५) अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत ग्यानिराम उर्फ बंडू बैतराम किरनापुरे (५०), कोमल ग्यानिराम किरनापुरे (२६), चंद्रीप्रकाश प्रेमलाल लिल्हारे (३५), विनोद ग्यानिराम किरणापुरे (२४), राहुल झनकलाल कटनकार (१९), गोपीचंद लोकचंद कटनकार (२१), काेमल योगराज नागपुरे (२८), ओमप्रकाश उर्फ दिनेश यादोराव नागपुरे (४५) गीता ग्यानिराम किरणापुरे (४५), निशिगंधा कोमल नागपुरे (२५) व भगवंतीबाई खेमलाल नागपुरे (३५) सर्व रा. लोहारा यांचा समावेश आहे. या आरोपींना दवनीवाडा पोलिसांनी अटक केली आहे. लाकडी दांडा व चप्पलने मारून राजेश्वर किरसानची गावभर धिंड काढली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वत: दवनीवाडा पोलीस ठाणे व लोहारा गाठून चौकशी केली. सोबतच तिरोडाचे उपविभागीय अधिकारी नितीन यादव यांनीही भेट देऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अटक झालेल्या ११ आरोपींपैकी तीन आरोपींना ४ जुलै रोजी, सात आरोपींना ६ जुलै रोजी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास दवनीवाडाचे ठाणेदार नीलेश उरकुडे करीत आहेत.