दागिणे स्वच्छ करण्याच्या नावावर ११ महिलांना लुटले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:32 AM2021-08-19T04:32:37+5:302021-08-19T04:32:37+5:30
गोंदिया : महिलांनो सावधान, आपल्याकडे कुणी महिला आपले मळकट दागिणे स्वच्छ करून देण्याच्या नावावर येत असतील तर त्यांना आपले ...
गोंदिया : महिलांनो सावधान, आपल्याकडे कुणी महिला आपले मळकट दागिणे स्वच्छ करून देण्याच्या नावावर येत असतील तर त्यांना आपले दागिणे देऊ नका. अन्यथा आपल्याला त्या गंडा घालतील. सध्या असा प्रकार शहरात सुरू असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला शहरातील ११ महिलांना गंडा घालण्यात आला आहे. एकाच दिवसात लाखो रूपयांचे दागिणे महिला घेऊन गेल्या आहेत.
शहरात शनिवारी (दि.१४) बाजपेयी वाॅर्ड परिसरात आलेल्या महिल जुने भांडे बदली करून नवीन भांडे देण्याच्या बहाण्याने घराघरात गेल्या. तसेच जुन्या सोन्याच्या बदल्यात इतर वस्तू देण्याच्या बहाणा केला व जूने सोने घासून नवीन करून देण्याच्या नावावर ३-४ महिलांनी शहरातील तब्बल ११ महिलांची फसवणूक केली. ज्या महिलांची फसवणूक केली त्यातील ५ महिला रामनगर पोलीस ठाणे तर ६ महिला शहर पोलीस ठाणे हद्दीतील असून लाखो रूपयांचे दागिणे त्या महिलांकडून नेले.
शहरातील महिलांचे दोन तोळे सोने त्या महिला घेऊन गेल्या आहेत. सोने स्वच्छ करून देण्याच्या नावावर त्यांच्या डोळ्यासमोरून दागिणे घेऊन जाणाऱ्या महिलांची तक्रार गोंदिया शहर व रामनगर पोलिसांत करण्यात आली. गोंदिया शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी महिलांची फोटो व त्यांचे संभाषण असलेली चित्रफित मिळविली असून त्यांच्या शोधासाठी पोलीस कामाला लागले आहे. जिल्ह्यात महिलांना फूस लावून दागिणे चोरणाऱ्या टोळीतील ४ महिलांचे चेहरे पोलिसांच्या समोर आले आहे. कुणाकडे नवीन भांडी देण्याच्या नावावर महिला आल्यात तर त्यांची माहिती पोलिसांना त्वरीत द्यावी, अशी माहिती शहर ठाणेदार महेश बनसोडे यांनी दिली आहे.