चार दिवसानंतर सायफन पुलात सापडला 'त्या' चिमुकलीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 05:40 PM2021-10-19T17:40:59+5:302021-10-19T17:46:55+5:30
चांदणी दसऱ्याच्या दिवशी शारदा विसर्जन मिरवणुकीत गुलालाने रंगलेला चेहरा धुण्यासाठी लगतच्या कालव्यावर उतरली असता तिचा पाय घसरून ती कालव्यात पडली. ती कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती.
गोंदिया : आमगाव तालुक्यातील गोरठा येथील ११ वर्षीय मुलगी चांदणी दिनेश पाथोडे ही दसऱ्याच्या दिवशी कालव्यात वाहून गेली होती. पुजारीटोला धरणातून निघालेल्या कालव्याच्या २६ किलोमीटर अंतरावरील जवरी गावाजवळील भूमिगत सायफन पुलात गावकऱ्यांच्या व शासकीय यंत्रणेच्या अथक प्रयत्नानंतर सोमवारी रात्री दरम्यान चांदनीचा मृतदेह सापडला.
आमगाव गोंदिया मार्गावरील गोरठा येथील चांदणी पाथोडे (११) ही दसऱ्याच्या दिवशी शारदा विसर्जन मिरवणुकीत गुलालाने रंगलेला चेहरा धुण्यासाठी लगतच्या कालव्यावर उतरली असता तिचा पाय घसरून ती कालव्यात पडली. ती कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तेव्हापासून तहसीलदार यांनी गावकरी व ढिवर समाजाच्या मदतीने कालव्यात शोध घेणे सुरू केले होते. तीन दिवस लोटूनही रविवारी सायंकाळपर्यंत शोध न लागल्याने गावकऱ्यांनी प्रशासन विरुद्ध संताप व्यक्त केला.
सोमवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी गावकऱ्यांची समजूत घालून पुन्हा यंत्रणा तपासाच्या कामाला लावली. जवरी गावाजवळ असलेल्या सायफन पुलात मृतदेह अडकल्याचा अंदाज वर्तविता जात होता. परंतु भूमिगत पुलात पाणी असल्याने कुणीही तिथे उतरण्यासाठी हिम्मत केली नाही. परंतु गावकऱ्यांनी कालव्याच्या दोन्ही बाजूला मातीचा बंधारा तयार करून पाणी अडविले.
पुलात पाणी असल्याने शोध पथकाला अडचण निर्माण होत असल्याने गावकऱ्यांनी मोटार पंपाद्वारे पाणी काढणे सुरू केले. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर बचाव पथकाला चिमुकलीचा शोध घेण्यास यश आले. सोमवारी रात्रीच्या दरम्यान चांदणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांना देण्यात आला.
बचाव पथक व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नांना यश
चिमुकली वाहून गेल्यापासून कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर जिल्हास्तरीय बचाव पथक व गावकऱ्यांनी गोरठा गावापासून जवरी गावापर्यंत कालव्यातील कोना कोना शोधून काढला होता. गावकऱ्यांनी बंधारा बांधून पाणी अडविले. लोकांचा आक्रोश बघता राज्यआपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या चमूला पाचारण करण्यात आले.