१११ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित

By admin | Published: April 3, 2017 01:42 AM2017-04-03T01:42:51+5:302017-04-03T01:42:51+5:30

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन

111 student scholarships are pending | १११ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित

१११ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित

Next

पत्रपरिषद : कैलाश डोंगरे यांचा आरोप
गोंदिया : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन हे कारण पुढे करून कोषागार अधिकाऱ्यांनी परत पाठविल्याचा आरोप संस्थाध्यक्ष कैलाश डोंगरे यांनी पत्रपरिषदेत केला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष कैलाश डोंगरे यांच्यासह संचालक सूर्यकांत डोंगरे व शैलेंद्र डोंगरे उपस्थित होते.
डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेद्वारे आॅनलाईन प्रवेश अर्ज मागवून गुणानुक्रमे प्रत्येक महाविद्यालयाला शीट अलॉट केल्या जातात. प्रवेश क्षमतेच्या ८० टक्के जागा शासकीय कोट्यातून कॅप राऊंडद्वारे भरल्या जातात. यात ८० टक्के जागा न भरल्या गेल्यास शिल्लक जागा प्रवेश प्रक्रिया नियमावलीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेच्या दिलेल्या तारखेनुसार महाविद्यालयीन स्तरावर भरल्या जातात. त्यांना स्पॉट राऊंड नाव दिले जाते व त्यांना अलॉटमेंट लेटरदेखील मिळतो.
यात सन २००९-१० पासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०१२-१३ पर्यंत शासन नियमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती. परंतु २०१२-१३ च्या मार्च महिन्यात जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे रूजू झाल्यानंतर त्यांनी स्पॉट राऊंडमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही म्हणून फार्म समाजकल्याण आयुक्त यांना परत पाठविले. परंतु राज्याच्या इतर जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या कृषी महाविद्यालयांना स्पॉट राऊंडमध्ये शिष्यवृत्ती मिळत होती. तोच आधार गोंदिया जिल्ह्याला देखील लागू होईल, अशी धारणा होती. मात्र जिल्हा कोषागार अधिकारी शासकीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून स्पॉट राऊंड म्हणजे महाविद्यालयाने स्वत:च्या जागा भरण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला, असे गृहित धरून त्यांची शिष्यवृत्ती नाकारत आहेत, असा आरोप कैलाश डोंगरे यांनी केला.
याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी नेमाडे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय (इबीसी-२०१५/प्र.क्र. ४६/शिक्षण-१, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई, दिनांक ३० मार्च २०१५) पाठवून सदर बाबीचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. या शासन निर्णयानुसार, राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेतून अथवा शासनाच्या सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील. मात्र सदर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अशा प्रवेशांंना प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिली असली तरी या योजनेचा लाभ होणार नाही, असे आहे. तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कार्यतर मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित विद्यालय/ महाविद्यालयामधील शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना लागू राहील, असे आहे.
या प्रकारामुळे सर्वत्र सावळा गोंधळ असून विद्यार्थी मात्र संभ्रमात पडले आहेत. मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन म्हणून नाकारण्यात आल्याने त्यांच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. आता संस्था, समाजकल्याण विभाग व कोषागार अधिकारी कोणता निर्णय घेतात की न्यायालय स्तरावर लढा दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 111 student scholarships are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.