मनरेगात ११३ टक्के उद्दिष्टपूर्ती
By admin | Published: May 17, 2017 12:16 AM2017-05-17T00:16:49+5:302017-05-17T00:16:49+5:30
तालुक्यात पंचायत समितीस्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्याने ११३ टक्के उद्दिष्टपूर्ती करीत जिल्ह्यात.....
रोजगार देण्यात सालेकसा अव्वल : विविध विकास कामांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यात पंचायत समितीस्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्याने ११३ टक्के उद्दिष्टपूर्ती करीत जिल्ह्यात मनरेगाची कामे उपलब्ध करुन देण्यात अव्वल स्थान प्राप्त केला आहे. शासनाने १०० टक्क्यांचे लक्ष्य ठेवले होते.
गोंदिया जिल्ह्याचा पूर्वी टोकावर मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्यासीमेवर असलेला सालेकसा तालुका विकासाच्या बाबतीत कोसो दूर असून या तालुक्यात मजूर वर्गाचा मोठा भरणा आहे. अनेक लोक कामाच्या शोधात वेळोवेळी शहराकडे पलायन करीत असतात. जर मजुरांना वर्षभर किंवा १००-१५० दिवस काम मिळाले तर शहरातील पलायन थांबविता येऊ शकते. तालुक्यात मजुरांना वेगवेगळी कामे उपलब्ध करुन देऊन या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असे वाटत आहे.
२०१६-१७ या वित्त वर्षात सालेकसा तालुक्याला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना एकंदरित चार लाख ४६ हजार ४६६ दिवस काम देण्याचे लाभ देण्यात आले होते. परंतु सालेकसा तालुक्यात एकंदरित मजुरांना पाच लाख चार हजार ४६० दिवसांचे रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. अर्थात दिलेल्या उद्दिष्टला पूर्ण करीत ११३ टक्के दिनाचे काम उपलब्ध करुन देण्यात यश आले आहे. त्यामुळे तालुक्यातील मजूर वर्गाच्या हाताला समाधानकारक काम मिळाल्याचे दिसून येत आहे.
ज्या प्रकारचे काम मनरेगा अंतर्गत करण्यात आले त्यात शौचालय निर्मिती, सोस खड्डे, सिंचन विहिरी, घरकुल बांधकाम, गाव तलाव, मैदान सपाटीकरण, रस्ता खडीकरण, पांदण रस्ते, जनावरांचा गोठा, शेळीपालन गोठा बांधकाम, गांढूळ खत निर्मिती, भातखचरे, वृक्ष लागवड आदिंचा समावेश होता.
एकंदरित प्राप्त लक्षांक पूर्ण करीत ११३ टक्के कामे करण्यात आली. कामाच्या लक्ष पूर्तीसाठी एपीओ डी.जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात इंजि. आर.जी.शेंडे, जी.जी. शहारे, एस.एस. बिसेन, आर.टी.लिल्हारे, डी.ए. उपराडे, पी.सी. बारेकर, एस.एस. सिंहारे, विश्वनाथ डोमा, एम.एस. उके, आर.एन. बर्वे, एस.बी. उपराडे, अनिता हरिणखेडे, पंकज चुटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
येत्या वित्त वर्षात सुद्धा मजुरांना अधिकाधिक मजुरीची संधी दिली जाईल, या दिशेने कामाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.
करण्यात आली ही कामे
पंचायत समिती स्तरावर एकून ६५० शौचालय बांधकाम, २४ सोष खड्डे, दोन सिंचन विहिरी, ६१८ घरकुल, सात गाव तलाव, १० मैदान सपाटीकरण, ३२ बर्मी खत केंद्र बनले, १० खत केंद्र प्रस्तावित आहेत. ५१ भात खाचरे बनविण्यात आली. तीन हजार वृक्ष लागवडीचे खड्डे खोदण्यात आले. यासह इतर कामेही करण्यात आली.