११३ बालमजुरांसाठी उघडल्या ४ संक्रमण शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:02 AM2017-10-08T00:02:56+5:302017-10-08T00:03:09+5:30
बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालपण हे सर्वांनाच हवे हवेसे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाºया बालकांवर पोट भरण्यासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यात बालमजूरी करणाºयांचीही संख्या कमी नाही. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने जून २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पकडलेल्या ११३ बालकांसाठी गोंदिया शहरात चार संक्रमण शाळा उघडल्या आहेत.
कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक जिल्ह्यात आहेत. आई-वडीलांच्या दुर्लक्षामुळे मांग गारुडी, नाथजोगी, फकीर यांची मुले बालमजूरीकडे वळतात. या बालमजूरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या प्रशिक्षण केंद्राची संख्या १६ झाली आहे.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकाराने बालकामगारांसाठी चार शाळा उघडण्यात आल्या. या १६ केंद्रात ४५७ बालमजूर शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजय नगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यात बाबाटोली, मुरकुडोह दंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू होते.
आता पुन्हा चार केंद्र सुरू करण्यात आले. हे चारही केंद्र गोंदिया शहरात आहेत. सुंदरनगर, यादव चौक, गड्डाटोली व छोटा गोंदिया केंद्र सुरू करण्यात आले.
सुंदरनगर व यादव चौकात येथे ३० बालके, गड्डाटोली येथे २२ बालके व छोटा गोंदिया केंद्रात ३१ बालके असे ११३ बालके या चार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहेत. मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहेत.
१६२१ बालके मुख्यप्रवाहात
बाल कामगार कार्यालयद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगार प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके स्वत:च्या पायावर उभे झाले आहेत. काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. बाल मजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात.सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला १५० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी आहे. बालमजूरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत. आई वडीलांच्या व्यसनामुळे बालमजूरी फोफावत आहे. मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले.
बालकामगारांसाठी १६ शाळा
बालकामगारांच्या उत्थानासाठी शासनाकडून गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १६ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात बाबाटोली, गौतमनगर, गोंडीटोला, कुडवा, भीमनगर, काचेवानी, दंडारी, नवरगाव, तिरोडा, मुंडीकोटा, मूर्री, अदासी, गोंदिया शहरातील सुंदरनगर, यादव चौक, गड्डाटोली व छोटा गोंदिया या ठिकाणी शाळा तयार करण्यात आले आहे.