११४९ तलावांत मासोळी संवर्धन

By admin | Published: June 19, 2017 01:23 AM2017-06-19T01:23:41+5:302017-06-19T01:23:41+5:30

तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय खुंटला होता. या मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी

114 9 Masoli culture in ponds | ११४९ तलावांत मासोळी संवर्धन

११४९ तलावांत मासोळी संवर्धन

Next

मस्त्य व्यवसायाला चालना: नागपूर विभागात ‘तलाव तेथे मासोळी अभियान’
नरेश रहिले/संतोष बुकावन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय खुंटला होता. या मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी व अनुवांशिकदृष्ट्या सुधारित जातींच्या मासोळीचे संवर्धन करण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्तांनी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११४९ तलांवामध्ये मासोळीचे संवर्धन केले जाणार आहे.
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मिती तसेच शहरी व ग्रामीण भागात मासोळीच्या स्वरुपात प्रथिनयुक्त आहाराची उपलब्धता वाढविणे हे ध्येय समोर ठेऊन विभागीय आयुक्तांनी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान गोंदिया जिल्ह्यापासून सुरू केले आहे.
नागपूर विभागात गोड्या पाण्यातील भूजल क्षेत्रात मत्स्यव्यवसायाला चांगला वाव आहे. विभागात १४ मोठे, ४९ मध्यम व राज्य तसेच स्थानिक क्षेत्र मिळून ६१८ लघुसिंचन प्रकल्प आहेत. शिवाय ६७३४ माजी मालगुजारी तलाव मत्स्य संवर्धनासाठी उपयुक्त आहेत. या जलस्त्रोतांसोबतच राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलयुक्त शिवार कार्यक्रम तसेच मागेल त्याला शेततळे, बोडी या अंतर्गत तयार करण्यात आलेली शेततळी, बोड्या खाजगी शेतकऱ्यांचे जागेत तयार करण्यात आलेली मस्त्य तळी मोठ्या प्रमाणात आहेत.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तलावातील गाळ काढणे, खोलीकरणामुळे जलसंचय तळ्यांचा वापर मत्स्यसंवर्धन व पालनासाठी होऊ शकतो. केंद्र शासनाच्या निलक्रांती धोरणा अंतर्गत भू-जलाशयीन व सागरी क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत मत्स्यव्यावसायीकांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचा संकल्प आहे. या अभियानामुळे निश्चितच निलक्रांती घडू शकते.
या अभियानांतर्गत प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर मत्स्यजीरे संचयन करून बोटुकली तयार करण्याकरीता किमान एक तलाव, बोडीची निवड केली जाणार आहे. बोटुकली तयार झाल्यानंतर तिचे संचयन करुन मत्स्यसंवर्धनाकरीता प्रत्येक महसूल मंडळातून किमान १० तलाव, बोडींची निवड करण्याचा विचार आहे. हे अभियान जून ते जुलै व आॅगस्ट ते सप्टेंबर अशा दोन टप्यात राबविण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, खाजगी मत्स्यसंवर्धक, शेततळी धारक, शेतकरी व स्वयंसहायता गटाच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यास मदत व्हावी, स्थानिक मासेमारांना रोजगार व शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध व्हावा, आदिवासी/दुर्गम व अन्य क्षेत्रात पोषणाचे दृष्टीने आहारात मासोळीचा वापर व्हावा या दृष्टीकोनातून हे अभियान सर्वोच्च प्राधान्याचा विभागीय फ्लॅगशिप कार्यक्रम म्हणून राबविण्यात येत आहे.
उपयुक्त विपणन पध्दतीने मत्स्यसाठयाची विक्री करुन उत्पन्न वाढविणे तसेच झालेल्या मत्स्य उत्पादकाचा काही भाग स्थानिक अंगणवाडी, आश्रमशाळा, वसतीगृहे तसेच प्राथमिक शाळेतील मध्यान्ह भोजनामध्ये उच्च प्रथिनेचा स्त्रोत म्हणून देण्यात येत असलेल्या पोषक आहारामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

गोंदियात फिशरी हब
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच.ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आर.डी.बागडे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, खंड विकास अधिकारी एन.आर.जमईवार व संबधीत तालुक्याचे खंडविकास अधिकारी मस्त्य व्यवसाय करणाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. अभियानात सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले. गोंदिया येथे फिशरी हबचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात मार्केटिंग व शितकरण केंद्राची स्थापना करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती पंचयात विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी बागडे यांनी दिली आहे.

Web Title: 114 9 Masoli culture in ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.