जिल्ह्यात मोहिमेदरम्यान आढळले ११४ कुष्ठरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:32 PM2017-09-29T23:32:43+5:302017-09-29T23:32:54+5:30
जिल्हा कुष्ठरोग विभागातर्फे जिल्ह्यात ५ ते २० सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग तपासणी मोहिमेदरम्यान ११४ कुष्ठरुग्ण आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा कुष्ठरोग विभागातर्फे जिल्ह्यात ५ ते २० सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग तपासणी मोहिमेदरम्यान ११४ कुष्ठरुग्ण आढळले. तर २ हजार ५२५ कुष्ठरोगाचे संशयीत रुग्ण आढळले. या रुग्णांच्या सर्व तपासण्या झाल्यावर संशयीत रुग्णांपैकी किती कुष्ठरुग्ण आहेत, असे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुष्ठरोगाला प्रतिबंध लावण्यासाठी कुष्ठरोग नियंत्रण विभागातर्फे जनजागृती व तपासणी मोहीम राबविली जात आहे. या अभियानातंर्गत जिल्ह्यातील एकूण १४ लाख ४५ हजार ३९ लोकसंख्येपैकी १२ लाख ६ हजार ९९५ लोकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून ८७ टक्के लोकांपर्यंत पोहोचण्यात या विभागाला यश आले. ही मोहिम राबविण्यासाठी एकूण १ हजार २१ पथक तयार केले होते. मोहिमेत आशा स्वंयसेविकांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता.
संशयीत रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यात ५८०, गोरेगाव २६५, आमगाव ३३७, तिरोडा ३७७, सालेकसा १७१, सडक-अर्जुनी २०४, देवरी २५२ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३९ रुग्णांचा समावेश आहे.
संशयित आढळलेल्या २ हजार ५२५ कुष्ठरुग्णांपैकी १ हजार ९६९ जणांची तपासणी करण्यात आली. यात ११४ कुष्ठरुग्ण आढळले. गोंदिया तालुका २६, गोरेगाव १५, आमगाव ६, तिरोडा ५, सालेकसा ६, सडक अर्जुनी २२, देवरी ४, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ३० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाºया जनजागृती मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील वर्षी आढळले २०५ रुग्ण
कुष्ठरोग नियंत्रण विभागातर्फे मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान २ हजार ९९४ संशयीत तर २०५ कुष्ठरुग्ण आढळले होते. त्यानंतर यंदा पुन्हा ११४ कुष्ठरुग्ण आढळल्याने या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे