पिण्याच्या पाण्याचे ११.५८ कोटी बाकी
By admin | Published: May 23, 2017 12:57 AM2017-05-23T00:57:42+5:302017-05-23T00:57:42+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याची अपेक्षा करतात, पण पाण्याचा कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात.
चांगल्या सुविधेसाठी भरपाईची गरज : कधीपर्यंत नुकसानीत चालणार पाणी पुरवठा, १०० कोटींच्या खर्चातून नवीन पाईप लाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याची अपेक्षा करतात, पण पाण्याचा कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गोंदिया शहरातील नागरिकांवर पाण्याचे कर आता वाढून ११ कोटी ५८ लाख चार हजार ८०० रूपये झालेला आहे.
उल्लेखनिय म्हणजे गोंदिया शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जवळपास १०० कोटी रूपये खर्च करून नवीन पाईप लाईन घातली. तीन नवीन पाणी टाकींचे बांधकाम करण्यात आले. नवीन जलशुद्धीकरण यंत्र लावण्यात आला. एवढेच नव्हे तर पाईप लाईनची जोडणी आपल्या खर्चातून बदलवून दिले जात आहे.
तसे पाहता शहरातील पाणी पुरवठा योजना चालविण्याची जबाबदारी नगर परिषदेकडे असायला हवी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना बनवून स्थानिक स्वायत्त संस्थेला हस्तांतरित करण्याचे निर्देश होते. परंतु शासकीय आदेश असतानाही अनेक वर्षांपूर्वी नगर परिषदेने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे तेव्हाची विवषता आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गळ्याचा फास बनला आहे.
पाणी कराच्या ११ कोटी ५८ लाख चार हजार ८०० रूपयांमधून सर्वाधिक रक्कम घरगुती ग्राहकांवर बाकी आहे. हे बिल मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढतच जात आहे. सन २०१४-१५ मध्ये घरगुती ग्राहकांवर आठ कोटी ७३ लाख सहा हजार ८९१ रूपये बाकी होते. ही रक्कम सन २०१५-१६ मध्ये वाढून नऊ कोटी ४५ लाख ३१ हजार ८९६ रूपये झाली व सन २०१६-१७ मध्ये ही रक्कम १० कोटी तीन लाख ५३ हजार ३०३ रूपयांवर पोहोचली आहे.
सद्यस्थितीत गोंदिया शहरात पाणी पुरवठ्याच्या कनेक्शनधाऱ्यांची संख्या एक हजार ३०० आहे. मागील काही वर्षात ही संख्या अधिक जास्त वाढली नाही. नवीन योजना सुरू करण्याच्या पूर्वी कनेक्शन दुप्पट होतील, असा अंदाज लावण्यात आला होता. परंतु नवीन योजना सुरू झाल्यानंतर शंभरापेक्षा अधिक कनेक्शन वाढू शकले नाही.
पाणी पुरवठ्याचे बिल न देणाऱ्या ग्राहकांमध्ये घरगुतीच नव्हे तर नगर परिषदेशिवाय विविध संस्था व गैरघरगुती ग्राहकांची संख्यासुद्धा कमी नाही. विविध संस्थांवर ५१ लाख १४ हजार ००१ रूपये, गैरघरगुती ग्राहकांवर ८९ लाख ५६ हजार ६८३ रूपये व नगर परिषदेवर १३ लाख ८० हजार ८१२ रूपयांचा बिल बाकी आहे. जर चांगली सुविधा हवी असेल तर शहरातील नागरिकांना पाण्याच्या कर भरणे आवश्यक आहे.
सध्या होत असलेल्या वसुलीतून कर्मचाऱ्यांचे वेतनसुद्धा निघत नाही. शेवटी नुकसानीत कधीपर्यंत ही योजना चालत राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकारामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा त्रस्त आहेत.
एवढा मोठा व्याज केव्हा देणार ग्राहक?
जे लोक पिण्याच्या पाण्याचा बिलच देत नाही, ते व्याजाची रक्कम कधी भरणार? असा सवाल विचारला जात आहे. घरगुती ग्राहकांवर सहा कोटी ३४ लाख १३ हजार २९६ रूपये पाणी कराचे लावण्यात आले आहे. पण याच्या व्याजाची रक्कमच तीन कोटी ६९ लाख ४० हजार ००७ रूपये आहे. यात मूळ रकमेत अर्धे व्याजच असल्याचे दिसून येते. संस्थांवर मूळ बिलाची रक्कम ४१ लाख ११ हजार २३२ रूपये आहे तर व्याज १० लाख दोन हजार ७६९ रूपये होत आहे. गैरघरगुती ग्राहकांवर मूळ रक्कम ६५ लाख ३९ हजार ८४५ रूपये बाकी आहे, तर व्याज २४ लाख १६ हजार ८३८ रूपये आहे. नगर परिषदेवर मूळ रक्कम १२ लाख ६८ हजार ४३४ रूपये बाकी आहे तर व्याज एक लाख १४ हजार ३७८ रूपये होत आहे.