सर्वसाधारण योजनेसाठी ११८.३८ कोटी

By admin | Published: August 18, 2016 12:11 AM2016-08-18T00:11:35+5:302016-08-18T00:11:35+5:30

सन २०१६-१७ मधून शासनाने ८६.५७ कोटींच्या आर्थिक मर्यादेत सर्वसाधारण योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते.

118.38 crores for the general plan | सर्वसाधारण योजनेसाठी ११८.३८ कोटी

सर्वसाधारण योजनेसाठी ११८.३८ कोटी

Next

कामे वेळेत पूर्ण करा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश
गोंदिया : सन २०१६-१७ मधून शासनाने ८६.५७ कोटींच्या आर्थिक मर्यादेत सर्वसाधारण योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने या योजनेच्या नियतव्ययात भर पडून ११८ कोटी ३८ लाख इतकी वाढ करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेतील या निधीचा वेळेत योग्य वापर करून गरजूंना योजनांचा लाभ द्या आणि विकास कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या बैठकीला जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, माजी मालगुजारी तलावातील पाण्याचा वापर शेती व मत्स्योत्पादनासाठी व्हावा यासाठी या तलावांच्या दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागाने नियोजनातून करावीत, असे सांगून ना.बडोले म्हणाले, त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यासोबतच मासेमारी संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. जिल्ह्यात दुधाचे संकलन वाढण्यासाठी दुग्ध व्यवसाय विभागाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्या शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्या इमारतींचे सर्वेक्षण करु न नव्याने इमारती बांधण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील बंगाली शाळेतील शिक्षकांचे प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील. काही भागात धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कृषी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, सन २०१५-१६ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना यावर २२१ कोटी ८ लक्ष रु पये निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यातील ११ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ४८ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या पर्यटन विकास कामांचा प्राधान्य आराखडा प्रस्ताव मंजुरी व निधी उपलब्धतेसाठी सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २३२ कोटी ३३ लक्ष रु पये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. सन २०१६-१७ च्या जिल्हा पर्यटन विकासासाठी ३ कोटी ३० लक्ष रु पये निधी मंजूर असून या निधीचा उपयोग जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी दिली.
सन २०१६-१७ मध्ये सर्वसाधारण योजनेत ११८ कोटी ३८ लक्ष, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ३८ कोटी ६५ लक्ष व आदिवासी उपयोजनेकरीता ७५ कोटी ३० लक्ष, असा एकूण २३२ कोटी ३३ लक्ष नियतव्यय मंजूर आहे.
सभेला समितीचे सदस्य शिला इटनकर, ओमप्रकाश येरपुडे, आशा पाटील, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावर, वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण मिहरे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांचेसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. आभार जिल्हा नियोजन अधिकारी तिडके यांनी मानले.(जिल्हा प्रतिनिधी)

- लोकप्रतिनिधींनी मांडल्या सूचना
आमदार संजय पुराम यांनी देवरी व सालेकसा तालुक्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी यावेळी केली.
गोंदिया शहरात माकडांचा, मोकाट जनावरांचा व डुकरांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असल्यामुळे नगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केली.
आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्ह्यातील शेतीचे माकडांमुळे व रानडुकरांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वनविभागाने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

Web Title: 118.38 crores for the general plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.