११८८ मामा तलावांची सर्वंकष दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 09:44 PM2018-04-08T21:44:38+5:302018-04-08T21:44:38+5:30
भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. यातूनच मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी तीन वर्षात जिल्ह्यातील ११८८ मामा तलावांची सर्वकष दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सर्व तलावांची दुरूस्ती झाली ८९९८ हेक्टर पुनर्स्थापित सिंचन क्षमता वाढून २५ हजार शेतकºयांना सिंचनाचा लाभ होईल.
जिल्ह्यातील १४२१ मामा तलावांपैकी ११८८ मामा तलाव स्थिती योग्य नसल्यामुळे या तलावांची सर्वकष दुरूस्ती करण्यासाठी तीन वर्षात विशेष दुरूस्ती करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी सन २०१६-१७ या वर्षात ४१८ तलावांची निवड करण्यात आली. त्या तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने २६ कोटी रूपये जिल्ह्याला दिले आहे. या वर्षातील तलावांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. तर सन २०१७-१८ या वर्षात ३७९ तलावांची निवड करण्यात आली आहे. त्या तलावांपैकी १२३ तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने ९ कोटी ११ लाख रूपये दिले आहेत. या दोन्ही वर्षातील तलावांची संख्या पाहता ४०० तलावांची कामे जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकºयांची शेती सिंचीत होईल. त्यामुळे आता शेतकºयांच्या शेताला पाणी मिळेल. परिणामी शेतकºयांचे उत्पन्न वाढेल.
असा होईल फायदा
जिल्ह्यातील ११८८ माल गुजारी तालवांची दुरूस्ती झाल्यास ८ हजार ९९८ हेक्टर सिंचन पुनर्स्थापीत होईल. यामुळे मत्स्य पालनाला वाव मिळेल व पीक क्षेत्र वाढणार आहे. दुरूस्तीपूर्वी ६३७५ हेक्टर मध्ये पीक घेतले जात होते. आता हजारो हेक्टर पीक क्षेत्र वाढणार आहे. मत्स्यव्यवसायात रोजगार उपलब्ध होऊन दरडोई उत्पन्न वाढेल. तलावावरील लोकसहभाग वाढेल परिणामी तलावांना जलवैभव प्राप्त होईल. तलावांसाठी निस्तार हक्क धारक पाणी वापर संस्था स्थापन होतील. सन २०१६-१७ मधील ४१८ कामांतून ३८४३ हेक्टर सिंचन, सन २०१७-१८ मधील ३७९ कामांतून २२६० हेक्टर सिंचन तर सन २०१८-१९ मधील ३९१ कामांतून २८९५ हेक्टर सिंचन होणार आहे.
मामा तलावांचे पुनरूज्जीवन कार्यक्रमातून तलावांची सर्वकष दुरूस्ती होत आहे. जून अखेरपर्यंत ४०० तलावांची दुरूस्ती पूर्ण होईल. लवकरच सर्वच तलावांची कामे पूर्ण होतील.
गोवर्धन बिसेन
उपअभियंता ल.पा. विभाग जि.प.गोंदिया.