१२ लाख ७० हजार रोपटे लावणार
By admin | Published: June 14, 2017 12:32 AM2017-06-14T00:32:11+5:302017-06-14T00:32:11+5:30
जिल्ह्यात १ ते ७ जुलै या काळात १२ लाख ७० हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे.
३१ लाख रोपटे सज्ज : पत्रपरिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात १ ते ७ जुलै या काळात १२ लाख ७० हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. त्यात वनविभाग ५ लाख ९० हजार, सामाजिक वनिकरण एक लाख ५० हजार, वनविकास महामंडळ १ लाख ८० हजार, ग्राम पंचायतींना २ लाख २ हजार तर इतर शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था मिळून १ लाख ४८ हजार रोपटे लावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्र परिषदेत दिली.
या वृक्ष लागवडीसाठी ११ लाख ५० हजार खड्डे खोदण्यात आले आहे. विभागानी तीन वर्ष लावलेले रोपटे व खड्डे आॅनलाईन अपलोड केले आहे. वनविभागाने यासाठी एक संगणक कक्ष स्थापन केले आहे. मागच्या वर्षी १० लाख ५० हजार रोपटे लावण्यात आले होते. त्यापैकी ८४ टक्के रोपटे जिवंत असल्याची माहिती देण्यात आली. यावर्षी पेल्टाफोरम, निलगीरी, सप्तपर्णी, एलीफंट, मॅजीयम, सिसु, काशीद यासारख्या वृक्षांची लागवड होणार नसून गोंदिया जिल्ह्यातील वनांमध्ये १९०७ साली गॅजेटमध्ये नोंदविलेल्या तसेच जंगल ट्री आॅफ सेंट्रल इंडिया या पुस्तकात नोंद असलेल्या झाडांची १०० टक्के रोपटी लावावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय कार्यालयाच्या आवारात जंगलात दुर्मीळ होत असलेल्या वृक्षांची लागवड करावी. वड,पिंपळ, जांभूळ यासारख्या घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी, शासकीय कार्यालयात १० टक्के रोपटे लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. २५ टक्के रोपटे पशु,पक्ष्यांना वर्षभर खाण्यासाठी उपयोगी पडतील अशा प्रजातीच्या रोपट्यांची लागवड करावी जसे जांभूळ, बेहळा, टेंभरुन, हिरडा, चार, आंबा, बोर, चिंच, मोहई, कुसूम, वड, पिंपळ लावण्याचे आवाहन करण्यात आले. पुढच्या वर्षी १०० टक्के रोपटे पशुपक्ष्यांना खाण्यासाठी उपयोगी पडतील अशा प्रजातीची लागवड केली जाणार आहे. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज उपस्थित होते.