जादुटोण्याच्या संशयातून धिंड, १२ जणांना ३ वर्षांची सक्तमजुरी
By नरेश रहिले | Published: November 1, 2023 06:23 PM2023-11-01T18:23:06+5:302023-11-01T18:23:44+5:30
जब्बारटोला येथे काढली होती धिंड : पीडिताला २० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश
गोंदिया : तालुक्यातील जब्बारटोला येथील पन्नालाल बघेले (६५) यांना मांत्रिक असल्याच्या संशयातून गावातील लोकांनी २९ जून २०१६ रोजी सामूहिक मारहाण करून गावातून धिंड काढली होती. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने जब्बारटोला येथील १२ जणांना ३ वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. ही सुनावणी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोली यांनी १ नोव्हेंबर रोजी केली.
गोंदिया तालुक्यातील जब्बारटोला येथील पन्नालाल बघेले यांना हिवराफाटा येथे २९ जून २०१६ रोजी रात्री ८ वाजताचे दरम्यान गावकऱ्यांनी मारहाण करून त्याची धिंड काढली होती. या प्रकरणात १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. जब्बारटोला येथील काही लोकांनी आपल्याला होत असलेल्या त्रासासाठी पन्नालाल बघेले याने केलेला जादुटोणा कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करत रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पन्नालाल बघेले याला रस्त्यात अडवून काही लोकांनी चौकशी केली. यावेळी त्यांना बेदम मारहाण केली होती. यात पन्नालाल बघेले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
या घटनेसंदर्भात पन्नालाल यांचा मुलगा संतोष बघेले यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी १२ जणांवर भादंविच्या कलम १४३, १४७, ३२३, ३२६, ३४२, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोषित कृत्यांना प्रतिबंधक व निर्मूलन व काळा जादू अधिनियम सन २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी केला होता. या प्रकरणातील १२ आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता मुकेश बोरीकर यांनी फिर्यादीची बाजू मांडली.
१२ जणांना शिक्षा, दोघांचा मृत्यू
या प्रकरणात जब्बारटोला येथील कैलाश नागपुरे, देवदास चिखलोंडे, संजू चिखलोंढे, मोरसिंह चिखलोंडे, राजकुमार चिखलोंडे, मुन्नालाल चिखलोंडे, सुरेंद्र चिखलोंडे, डोमा बागडे, दिनेश बागडे, देवचंद चिखलोंडे, धर्मराज चिखलोंडे व बाबुलाल चिखलोंडे या १२ जणांना शिक्षा ठोठावली आहे. यातील धर्मराज चिखलोंडे व बाबुलाल चिखलोंडे ह्यांचा मृत्यू झाला आहे.
अशी सुनावली शिक्षा
भादंविच्या कलम १४३ अंतर्गत २ महिन्यांचा कारावास, कलम १४७ अंतर्गत ६ महिन्यांचा कारावास, कलम ३२३ अंतर्गत एक वर्षाचा कारावास व कलम ३२६ अंतर्गत ३ वर्षांचा कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावला. काळा कायदा सन २०१३ च्या कलम ३ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये प्रत्येकी दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी फिर्यादी संतोष बघेले व जखमी पन्नालाल बघेले यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.