लोकसहभागातून १२ हजार वृक्षलागवड
By admin | Published: July 2, 2016 01:57 AM2016-07-02T01:57:50+5:302016-07-02T01:57:50+5:30
आजघडीला निसर्गाचे चक्र बदलल्याचे दिसत आहे. निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. अजाणतेपणे वृक्षतोड झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.
नाना पटोले : झाडांचे संगोपन करणाऱ्यास खासदार चषक पुरस्कार
अर्जुनी मोरगाव : आजघडीला निसर्गाचे चक्र बदलल्याचे दिसत आहे. निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. अजाणतेपणे वृक्षतोड झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. जंगलामधील वृक्षकटाई थांबवून वृक्ष रोपणाबरोबर त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची आज गरज आहे. झाडांचे रक्षण करण्यात आपण कमी पडल्याने दिवसेंदिवस पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी तसेच पावसाचे प्रमाण वाढवून शेतकऱ्यांमध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावा-गावांमध्ये वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करुन मोकळे न होता, त्यांच्या संगोपणाची जबाबदारी घेण्यास प्राथमिकता देणे आवश्यक आहे. जो कोणी जास्तीत जास्त झाडे लावून जगवेल, त्यांना खासदार चषक पुरस्कार अंतर्गत पारितोषिक देवून गौरविण्यात येईल, अशी घोषणावजा प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या येथील क्षेत्र सहाय्यक कार्यालयाच्या कृत्रिम पुनरनिभित मिश्र रोपवनात १२ हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
रोपवनात आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, निलिमा पाटील भुजबळ, प्रोडिसीएफ राहुल पाटील, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी सी.एस. उदापुरे, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, ठाणेदार नामदेव बंडगर, सरपंच राधेशाम झोळे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, एस.एस.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजिव पाटणकर, प्राचार्य एन.एस. डोंगरवार उपस्थित होते.
शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथील मिश्र रोपवनात तालुक्यातील विविध संघटना व लोकसहभागातून श्रमदानातून स्वयंस्फूर्तीने १२ हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
यामध्ये स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, तंमुस, मानवता कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. हायस्कूल, अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, बहुउद्देशिय विद्यालय, कल्की मानव सेवा समिती, तिबेटीयन मैत्री संघ तिबेट वसाहत, देऊळगाव (बोदरा), निमगाव, खांबी, अरततोंडी, तिडका येथील वन समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह गावातील नागरिकांसह दोन हजाराच्या लोकसहभागातून विविध प्रजांतीच्या १२ हजार वृक्षांची लागवड श्रमदानातून करण्यात आली. वनमहोत्सवाला लोकाश्रय मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिने झाडे जगविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले. उद्घाटननीय समारंभाचे संचालन प्रा. डॉ. दिलीप काकडे यांनी केले. आभार प्रोडिसीएफ राहुल पाटील यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
तिबेटियन्सचा सहभाग
२० कि.मी. अंतरावरुन आलेल्या तिबेटीयन मैत्री संघाच्या ४५ पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तिने वृक्ष लागवड केली. सोनम फुटी या ६९ वर्षीय महिलाचा त्यात समावेश होता. जंगलातील झाडे आपण तोडतो, त्या बदल्यात झाडे लावून त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड काळाची गरज आहे. शुद्ध हवा, पाणी मिळण्यासाठी झाडे लावावे अशी ती लोकमत जवळ बोलले.