शहरातील १२३ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:31+5:302021-06-04T04:22:31+5:30
गोंदिया : पावसाळ्यात जीर्ण इमारतींना जास्त धोका राहत असून, अशा जीर्ण इमारतींकडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता ...
गोंदिया : पावसाळ्यात जीर्ण इमारतींना जास्त धोका राहत असून, अशा जीर्ण इमारतींकडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता पावसाळा तोंडावर आला असून पाऊस कधीही हजेरी लावू शकतो. अशात जीर्ण इमारतींपासून त्यात राहणाऱ्या किंवा अशा या जीर्ण इमारतींच्या परिसरातून ये-जा करणाऱ्यांना धोका होऊ शकतो. विशेष म्हणजे, शहरातही असे प्रकार घडले आहेत. आता मालमत्ताधारकांच्या हलगर्जीपणामुळे कुणाच्या जिवावर बेतू नये किंवा मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी अशा जीर्ण मालमत्ता किंवा तिचा जीर्ण भाग पाडणे गरजेचे असते.
यासाठी आता नगर परिषदेने शहरातील अशा जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण सुरू केले असून, जीर्ण मालमत्ताधारकांना नोटीस बजावली आहे. आतापर्यंत नगर परिषदेने अशा १२३ जीर्ण इमारतींची यादी तयार केली असून, त्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे.
---------------------------------
नगर परिषद बजावत आहे नोटीस
शहरातील जीर्ण इमारतींपासून कुणालाही धोका होऊ नये यासाठी नगर परिषद अशा इमारतींचे कर विभागातील मोहरीलच्या माध्यमातून सर्वेक्षण करते. तसेच अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजावून अशा जीर्ण इमारती पाडण्याबाबत कळविते. दरवर्षी अशाच प्रकारे नोटीस बजाविली जाते. मात्र मालमत्ताधारक जीर्ण इमारती पाडत नसल्याचेही दिसते. यंदा मात्र नगर परिषदेने अशा जीर्ण मालमत्ता पाडा अन्यथा त्यासाठी संबंधित व्यक्तीच जबाबदार राहील, अशी नोटीस धाडली आहे.
------------------------------
संबंधित व्यक्ती राहणार जबाबदार
अशी जीर्ण इमारत पडून कुणालाही काही धोका झाल्यास संबंधित मालमत्ताधारक जबाबदार राहतो. यासाठीच नगर परिषदेने आता नगर पालिका अधिनियमांतर्गत मालमत्ताधारकांना जबाबदार धरून नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. शिवाय काही अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटिसीतून बजावले आहे.
--------------------------
याशिवाय काही उपाय नाही
घराची अवस्था जीर्ण झाली आहे हे आम्हालाही माहीत आहे. मात्र घराची दुरुस्ती किंवा ते पाडून नव्याने बांधकाम करण्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे जोपर्यंत चालत आहे तोपर्यंत दिवस काढावेत, याशिवाय काही उपाय नाही.
- एक रहिवासी
-----------------------------------------
राहण्याची सोय तरी आहे
घराला दुरुस्तीची गरज आहे हे आम्हालाही माहीत आहे. मात्र दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने आहे त्या स्थितीत राहावे लागत आहे. अशाच घरात दिवस निघत चालले आहेत.
- एक रहिवासी