१२३.५० हेक्टर जंगलात वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:59 PM2018-04-29T23:59:39+5:302018-04-29T23:59:39+5:30
उन्हाळ्यात जंगलात वणव्याच्या घटना वाढतात. एवढेच नव्हे तर जंगलाला लागून असलेल्या भागातही आगीच्या घटनांत वाढ होते. मागील तीन महिन्यांवर नजर घातल्यास वन विकास महामंडळ व वन प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वणव्याच्या घटना घडल्या असून त्यात १२३.५० हेक्टर क्षेत्रात याचे परिणाम जाणवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्यात जंगलात वणव्याच्या घटना वाढतात. एवढेच नव्हे तर जंगलाला लागून असलेल्या भागातही आगीच्या घटनांत वाढ होते. मागील तीन महिन्यांवर नजर घातल्यास वन विकास महामंडळ व वन प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वणव्याच्या घटना घडल्या असून त्यात १२३.५० हेक्टर क्षेत्रात याचे परिणाम जाणवले आहे.
उन्हाची दाहकता वाढल्यास आगीचे प्रकारही वाढतात. उष्णतेमुळे जंगलातील सुकलेला पाला-पाचोळा लवकरच पेट धरतो व पुढे त्याचे आगीच्या भडक्यात रूपांतर होते. या वणव्यात मोठमोठाले जंगल राखेत बदलायला वेळ लागत नाही. या वणव्याच्या घटनेने जंगल जळून खाक होत असतानाच वन्य पशूंनाही याचा फटका सहन करावा लागतो. जिल्ह्यातही वणव्याच्या अशा या घडत आहेत. येथे जानेवारी ते मार्च या कालावधीत वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात वणव्याच्या एकूण ३६ घटना घडल्याची नोंद आहे.
यामध्ये, मार्च महिन्यात ३५ घटना घडल्या असून एप्रिल महिन्यातील घटनांची माहिती नाही. तरिही मार्च महिन्यातील घटनांपेक्षा जास्त घटना घडल्यास आश्चर्य नाही असे म्हटले जात आहे. देहरादून येथील सॅटेलाईट चॅनलकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे वणव्याच्या घटनांची तपासणी करण्यात आली व त्यानंतरच ही आकडेवारी देण्यात आली आहे. जंगलातील वणव्याच्या या घटनांत आग पसरू नये यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात आले.
विशेष म्हणजे, वाळलेला पालापाचोळा जळल्यानंतर पसरणारी आग नियंत्रीत करण्यासाठी जाड रेषा बनविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. जंगलातील झाडांवरून पडलेली वाळलेली पाने आगीला दूरवर नेते. यावर जाड रेषा ही आग नियंत्रीत करण्यासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होते. वेळीच करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वणव्यावर नियंत्रण मिळविता आले व त्यामुळे वन संपत्तीही बचावली.
२७.५० हेक्टर वन क्षेत्र आगीच्या विळख्यात
जिल्ह्यात घडलेल्या या घटनांत सर्वाधिक घटना देवरी वन प्रकल्प विभागात नोंद करण्यात आल्या आहेत. या विभागात एकूण १६ घटनांची नोंद असून २७.५० हेक्टर वन क्षेत्र आगीच्या विळख्यात आले आहे. तर सर्वाधिक वन क्षेत्र जांभळी-२ मध्ये आगीत आले. गोंदिया-डोंगरगाव वन प्रकल्प विभागात ४ घटना घडल्या असून ६४.५० हेक्टर तर अर्जुनी-मोरगाव वन प्रकल्प विभागात ३ घटना घडल्या असून यात ७.५० हेक्टर क्षेत्र आगीच्या हवाली झाले.
वणव्याच्या ३६ घटना घडल्या आहेत. मात्र यामुळे रोपवनांचे नुकसान झाले नाही. या घटनांत जमिनीवर पडलेला पालापाचोळा जळाला. पूर्व तयारी व वेळीच पाऊल उचलल्यामुळे त्रास झाला नाही.
-पी.जी. नौकरकर
विभागीय प्रबंधक, एफडीसीएम लि. वन प्रकल्प गोंदिया