१२४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना बिनकामाचे वेतन
By admin | Published: March 3, 2016 01:43 AM2016-03-03T01:43:39+5:302016-03-03T01:43:39+5:30
गोंदियातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला अद्याप ‘एमसीआय’कडून मंजूर मिळाली नाही. लवकर कॉलेज सुरू होणार असे सांगत एक ते दिड वर्षापासून ....
मेडिकल कॉलेजचे भिजत घोंगडे : एकाही रूग्णाची तपासणी नाही
गोंदिया : गोंदियातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला अद्याप ‘एमसीआय’कडून मंजूर मिळाली नाही. लवकर कॉलेज सुरू होणार असे सांगत एक ते दिड वर्षापासून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र त्यांना काहीच काम नसल्याने वर्षभरापासून बिनकामाचे वेतन दिले जात आहे. केटीएस किंवा बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची ड्युटी लावल्यास नागरिकांनाही सेवा मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय रूग्णांच्या सेवेसाठी तयार होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी मेहनत घेऊन गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करवून घेतले. परंतु या वैद्यकीय महाविद्यालयाला मेडिकल कॉन्सील आॅफ इंडियाची परवानगी मिळाली नाही. काही उणीवा असल्याने त्या दूर केल्या जात आहेत.
या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने वर्ग एकचे १५ अधिकारी, वर्ग २ चे ९ अधिकारी, वर्ग ३ चे ३३ कर्मचारी आणि वर्ग ४ चे ६२ कर्मचारी नियुक्त केले. मागील वर्षभरापासून ते येथे कार्यरत आहेत. परंतु आरोग्य सेवा देण्यासाठी असलेले हे कर्मचारी, अधिकारी प्रत्यक्षात आरोग्य सेवा न देताच वर्षभरापासून कार्यालयात येऊन गप्पा मारणे यापलीकडे काहीही काम करताना दिसत नाही. त्यामुळे शासनाला महिन्याकाठी ३० ते ४० लाखांचा भूर्दंड बसत आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मंजुरी मिळून वर्ग सुरू होण्यास वेळ आहे. त्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची (डॉक्टरांची) सेवा केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात किंवा बाई गंगाबाई रुग्णालयात का घेतल्या जात नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता असताना तेथील डॉक्टरांना अधिक तास काम करावे लागते. असे असताना वैद्यकीय महाविद्यालयासाठी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा घेणे गरजेचे असल्याची भावना गोंदियावासीयांकडून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
असे आहेत अधिकारी, कर्मचारी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग एकचे अधिष्ठाता एक, प्राध्यापक ४, सहयोगी प्राध्यापक १०, वर्ग २ चे सहायक प्राध्यापक ९, वर्ग ३ चे वरिष्ट सहाय्यक २, वरिष्ट लिपीक ८, कनिष्ठ लीपीक ११, लघुलेखक ५, तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ ५, कलाकार १,ट्यूटर १, वरिष्ठ निवासी ४ व शिपायांची ६२ पदे असे एकूण १२४ कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत.
२५ एकारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
कुडवा येथील वनविभागाच्या २५ एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय तयार होणार आहे. यात शिकवणी वर्ग, हॉस्टेल, ५०० बेडची व्यवस्था राहणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर आतापर्यंत कोट्यवधी रूपये खर्च झाले परंतु याचा प्रत्यक्षात फायदा रूग्णांना कवडीचाही झाला नाही. कार्यरत अधिकाऱ्यांनी केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सेवा दिल्यास तेथील डॉक्टरांच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी होईल व रूग्णांही उत्तम सेवा मिळेल.
रूग्ण तपासले शून्य
शासकीय महाविद्यालयात १२४ कर्मचारी अधिकारी कार्यरत असून आतापर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत अधिकारी यांनी एकाही रूग्णाची तपासणी केली नाही. किती रूग्णांची तपासणी केली, असे येथील अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांना विचारणा केल्यावर त्यांनी कोणाचीही तपासणी केली नाही, असे सांगितले.