चिमुकल्यांच्या खाऊच्या पैशांतून जमले १३ हजार ५०० रुपये
By admin | Published: March 4, 2017 12:17 AM2017-03-04T00:17:00+5:302017-03-04T00:17:00+5:30
नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत घरून मिळालेले खाऊचे पैसे व नातलगांनी दिलेले पैसे शाळेत येऊन
शाळेचा नाविण्यपूर्ण उपक्रम : सर्वच विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल
तिल्ली-मोहगाव : नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत घरून मिळालेले खाऊचे पैसे व नातलगांनी दिलेले पैसे शाळेत येऊन शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांनी जमा केले. त्यातून १३ हजार ५०० रूपये जमा झाले व जे आर्थिकरीत्या मागासलेले होते त्या विद्यार्थ्यांनासुद्धा शैक्षणिक सहलीत सहभागी होता आले. हा उपक्रम जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव (तिल्ली) येथे राबविण्यात आला.
सदर शाळेत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम सतत राबविले जातात. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, बौध्दीक व शारीरिक विकास घडविण्यासाठी सर्व शिक्षक नेहमी क्रियाशील आहेत. सोबतच विद्यार्थ्यांना विविध पर्यटनस्थळे दाखवून पर्यावरणप्रेमी बनवून त्यांना समग्रदृष्टी मिळावी यासाठी दरवर्षी विविध ठिकाणी सहलीला नेले जाते. शैक्षणिक सत्र २०१५-१६ मध्ये शाळेची सहल फन अॅन्ड फूड नागपूर जाऊन आल्यानंतर केलेल्या मौजमस्तीची चर्चा शाळेत जोरात होऊ लागली. ही चर्चा ऐकून नेहा बोपचे ही निरागस मुलगी ओक्सोबक्शी रडायला लागली. तिच्या रडण्याच्या संवेदनामधूनच शाळेचे पदवीधर शिक्षक अशोक चेपटे यांना शालेय सहल निधी या अभिनव उपक्रमाची कल्पना सुचली.
दुसऱ्या दिवसापासून स्कूल पिकनिक कलेक्शन फंड असा उपक्रम सुरू झाला. विद्यार्थी यथाशक्ती मिळालेले खाऊचे पैसे शाळेत आणू लागले व वर्गात जमा करू लागले. नातेवाईकांनी दिलेले पैसे, पाकेटमनी खर्च न करता तेच पैसे शाळेत जमा करण्यात आले.
यावर्षी वर्ग सातवीमधील ३५ व इतर ४५ अशा एकूण ९० विद्यार्थ्यांनी छत्तीसगड राज्यातील भिलाई प्राणी बाग व संग्रहालय, डोंगरगढ, हाजराफॉल येथे जाऊन याच वयात पर्यटनाचा मनस्वी आनंद घेतला.
या उपक्रमांतर्गत वर्ग सातवीमध्ये या सत्रात १३ हजार ५०० रुपये जमा झाले. यामुळे शाळेतील व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सहजपणे सहलीला नेता आले. यासाठी मुख्याध्यापक बी.सी. वाघमारे, विषय शिक्षक एस.एच. मेश्राम, डी.एस. राऊत, एल.के. ठाकरे, एच.के. धपाडे, तानाजी ठाकरे, अनिल मेश्राम सहकार्य करीत आहेत.(वार्ताहर)