Gondia: ‘आरोग्य’मध्ये नोकरी लावतो... थोडे थोडे करत दोघांना १३.६० लाखांचा गंडा, चौघांवर गुन्हा दाखल
By नरेश रहिले | Published: November 21, 2023 07:31 PM2023-11-21T19:31:12+5:302023-11-21T19:31:48+5:30
Gondia News: आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावून देण्याच्या नावावर दोघांकडून १३ लाख ६० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांवर डुग्गीपार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- नरेश रहिले
गोंदिया - आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावून देण्याच्या नावावर दोघांकडून १३ लाख ६० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांवर डुग्गीपार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल दीड वर्षापासून पैसे मोजूनही नोकरीची प्रतीक्षा करीत असलेल्या त्या दोघांच्या पदरी निराशा आली आणि त्यांनी अखेर पोलिस ठाणे गाठून फसवणूक करणाऱ्या चार जणाविरोधात तक्रार केली आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील दीक्षा सुभाष मेश्राम (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दीक्षा मेश्राम ह्या १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता बाणटोला येथील धाब्यावर ब्रम्हदास बडोले यांच्यासह चहा पीत असतांना त्या ढाब्यावर चारचाकी गाडी क्रमांक (एम.एच.३१ सी.आर.१०८०) हे वाहन आले. त्या वाहनातील व्यक्तीनीही चहाची व पाण्याच्या बॉटलची ऑर्डर दिला. त्या ग्राहकाने आपली ओळख चंदू किसन खोब्रागडे (रा. ब्रम्हपुरी) अशी देत आपण फायलेरीया विभागत डॉक्टर असून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली खूप मोठी ओळख आहे, असे सांगितले.
फायलेरिया विभागात आरोग्य सेवक पदाची भरती निघाली आहे. तुमचे काही कॅंडीडेट असल्यास सांगा, आपण आपल्या ओळखीने त्यांना आरोग्य विभागामध्ये आरोग्यसेवक या पदावर लावून देतो असे सांगितले. नोकरीवर लावण्यासाठी एका व्यक्तीमागे ८ लाख रुपये द्यावे लागतील, असेही तो म्हणाला. त्याने आपला मोबाइल क्रमांक दिला आणि दीक्षा मेश्राम यांचा मोबाइल क्रमांक घेऊन गेला. चार-पाच दिवसांनतर चंदू खोब्रागडे हा दीक्षा यांच्या घरी त्याची पत्नी सुचिता, मुलगी मोनिका (२४) व सानिया (२२) यांच्यासोबत आला.
थोड्यावेळाने आलेले ब्रम्हदास बडोले यांनीही आपल्या मुलाच्या नोकरीसाठी चंदू खोब्रागडे यांना पैसे दिले असल्याचे सांगितले. पैसे जमवून ठेवा असे सांगून तो निघून गेला. पुन्हा आठ-दहा दिवसाने चंदू खोब्रागडे हा आपल्या पत्नी व मुलीसह दीक्षा यांच्या घरी चिखली येथे आला. त्यावेळी त्यांना ३ लाख ७५ हजार रुपये रोख दिले. त्यावेळी त्याची मुलगी मोनिका हिने काळजी करू नका, तुमची नोकरी पक्की आहे असे सांगितले. परंतु तब्बल २२ महिने लोटूनही नोकरी न देता त्यांची १३ लाख ६० हजाराने फसवणूक केली. या संदर्भात चारही आरोपींवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद बांबोडे करीत आहेत.
आधी दिला विश्वास, फोन उचलणे केले बंद नंतर दिली धमकी
चंदू खोब्रागडे याने आधी नोकरी लाऊन देण्याचा विश्वास दाखविला. पैसे घेतल्यावर नोकरी लाऊन देण्याच्या केवळ भूलथापा दिल्या. त्यानंतर वारंवार फोन केल्याने फोन बंद केले.
दीक्षाकडून घेतले ८ लाख तर मंगेशच्या नोकरीसाठी घेतले ५.६० लाख
९ जुलै २०२२ रोजी १ लाख रुपये, ४ ऑगस्ट २०२२ राेजी १ लाख ८० हजार रुपये, २१ सप्टेंबर २०२२ रोजी १ लाख ४५ हजार रोख रक्कम असे एकूण ४ लाख २५ हजार रुपये ट्रान्सफर केले तर ३ लाख ७५ हजार रुपये रोख दिले. तर मंगेश बडोले याला नोकरी लावून देण्याच्या नावावर २३ जानेवारी २०२२ रोजी ५० हजार, २५ जानेवारी २०२२ रोजी ५० हजार, ६ एप्रिल २०२२ रोजी १ लाख, २० एप्रिल २०२२ रोजी ४५ हजार, २५ एप्रिल रोजी ५० हजार, २६ जून रोजी ४५ हजार ८ जून २०२२ रोजी ५० हजार, दुसऱ्यांदा २५ हजार, १७ डिसेंबर २०२२ रोजी ४५ हजार असे ४ लाख ६० हजार रुपये ऑनलाइन व १ लाख रोख असे एकूण ५ लाख ६० हजार दिले.
यांच्यावर गुन्हा दाखल
दोघांना आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावून देण्याच्या नावावर आरोपी आरोपी चंदू किशन खोब्रागडे (५०), सुचिता चंदू खोब्रागडे (४३), मोनिका चंदू खोब्रागडे (२४) व सानिया चंदू खोब्रागडे (२२) सर्व (रा. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.