138 जि.प. शाळांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 05:00 AM2021-08-21T05:00:00+5:302021-08-21T05:00:22+5:30
जिल्हा परिषदेंर्गत चालविण्यात येणाऱ्या सुमारे १३८ शाळा इमारतीवरून विजेच्या जिवंत तारा गेल्या असून, अनेक शाळांच्या आवारातच विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता कधीही वादळामुळे एखादी जिवंत तार तुटली, तर मोठा अपघात होऊ शकतो, म्हणून इमारतीवरील तारा काढण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने १० ऑगस्ट २०१७ ला ठराव करून पाठपुरावा सुरू केला होता.
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिपच्या शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिकत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १०३९ पैकी तब्बल १३८ शाळांच्या परिसरातून जिवंत विद्युत तारा गेल्या आहेत. वादळ, वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जिवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका होता. हे चिमुकल्यांवरील संकट दूर करण्यासाठी जिल्हा परिषद अद्यापही तयार नाही. या जिप शाळांवरील विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.
जिल्हा परिषदेंर्गत चालविण्यात येणाऱ्या सुमारे १३८ शाळा इमारतीवरून विजेच्या जिवंत तारा गेल्या असून, अनेक शाळांच्या आवारातच विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता कधीही वादळामुळे एखादी जिवंत तार तुटली, तर मोठा अपघात होऊ शकतो, म्हणून इमारतीवरील तारा काढण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने १० ऑगस्ट २०१७ ला ठराव करून पाठपुरावा सुरू केला होता. विद्युत विभागाने सर्वेक्षण करून येणाऱ्या खर्चाचे आराखडे तयार केले होते; परंतु निधी उपलब्ध नसल्याने हा प्रश्न तसाच पडून होता. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १३८ शाळांच्या इमारतींवरून विजेच्या वाहिन्या गेल्या आहेत. या कामासाठी लागणारे ६ कोटी ५० लाख रुपये पूर्व विदर्भासाठी असलेल्या निधीमधून तातडीने खर्च करण्याचे निर्देश संबंधितांना दिले होते; परंतु ते निर्देश हवेतच विरले.
तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक शाळांवर वाहिन्या
- चिमुकल्या विद्यार्थ्यांवर संकट ओढवणाऱ्या जिवंत विद्युत वाहिन्या व ट्रान्सफाॅर्मरची चौकशी केली असता तिरोडा तालुक्यातील ३७ शाळांच्या आवारातून या वाहिन्या गेल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २६ शाळा, आमगाव २२ शाळा, सडक-अर्जुनी २० शाळा, सालेकसा १३ शाळा, गोंदिया ११ शाळा, देवरी ६ शाळा, तर गोरेगाव तालुक्यातील ३ शाळा, अशा एकूण १३८ शाळांचा समावेश आहे.
शाळांवरून गेलेल्या जिवंत विद्युत तारांच्या मुद्याकडे आपण अनेकदा शासनाचे लक्ष वेधले. नुकत्याच पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीतसुद्धा या मुद्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
-गंगाधर परशुमकार, माजी जिप सदस्य